नवी दिल्ली : कोरोना काळातील लॉकडाऊन, सततची इंधन दरवाढ आणि महागाईने त्रस्त नागरिकांना 400 वस्तू आणि 80 सेवांवरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कमी करून केंद्र सरकारने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. वॉशिंग मशिन, व्हॅक्यूम क्लीनर आणि टी.व्ही. यासारख्या घरगुती उपकरणांवर लागणारा कर 31.3 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे.
ज्या वस्तू आणि सेवांवरील जीएसटी कर कमी करण्यात आला आहे, त्यातील बहुतांश वस्तू व सेवांवर केंद्र व राज्य सरकारचा एकत्रित जीएसटी 31 टक्के इतका होता. जीएसटी दर कमी केल्याने करदात्यांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
केसांचे तेल, टूथपेस्ट आणि साबण यासारख्या घरगुती वापराच्या वस्तूंवर जीएसटी येण्यापूर्वी 29.3 टक्के कर आकारला जात होता. जीएसटीअंतर्गत हा कर आणखी कमी होऊन 18 टक्के करण्यात आला आहे. तसेच वॉशिंग मशिन, व्हॅक्यूम क्लीनर आणि टी.व्ही. यासारख्या घरगुती उपकरणांवर लागणारा कर 31.3 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे.
जीएसटीअंतर्गत कृषी क्षेत्राला पुरेशी सवलत देण्यात आली आहे. खतांच्या बाबतीत जीएसटी निम्मा करण्यात आला आहे. कृषी अवजारांवर कर 15 टक्के ते 18 टक्क्यांवरून 12 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आला आहे. काही वस्तूंवर कर 8 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला आहे. रासायनिक खतांवर केवळ 5 टक्के कर लागू आहे.
दरम्यान, देशात 1 जुलै 2017 पासून जीएसटी लागू करण्यात आला आहे. मागील 4 वर्षांत जीएसटी दर कमी करण्यात आला असून, नागरिकांवर कराचा बोझा कमी पडावा, यासाठी प्रयत्न केले गेले आहेत. तसेच छुप्या करांना कमी करून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये स्वदेशी उद्योगांना चालना मिळावी म्हणून अनेक बदल करण्यात आल्याचे मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
सिनेमा तिकिटावर 12 टक्के कर
सिनेमा तिकिटांवरील करदेखील कमी करण्यात आला आहे. यापूर्वी हा कर 35 ते 110 टक्के आकारला जात होता. परंतु, आता जीएसटीनंतर 100 रुपयांच्या तिकिटांवर 12 टक्के आणि इतर तिकिटांवर 18 टक्के कर आकारला जाणार आहे.