अकोला: मनरेगाअंतर्गत कृषी विभागातर्फे वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना राबवल्या जातात. शेतकरी बांधवांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी यांनी केले आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड, बांधावर वृक्ष लागवड, फुलशेती, नाडेप कंपोस्ट, गांडुळ खत, विहीर पुनर्भरण या वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येतात.
फळबाग लागवडीसाठी संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, सीताफळ, आवळा, आंबा, पेरू, चिकू आदी, तर बांधावर लागवडीसाठी साग, बांबू, शेवगा, कडूलिंब, सोनचाफा, बोर, सीताफळ, आवळा, आंबा आदींसाठी अनुदान देय आहे. फुलपीकांमध्ये निशिगंध, गुलाब व मोगरा फुलपीकांसाठी अनुदान देय आहे. नाडेप कंपोस्टसाठी, तसेच गांडुळ खत युनिटसाठी प्रत्येकी 11 हजार, तर विहिर पुनर्भरणासाठी 14 हजार रुपये अनुदान मिळते.
जॉबकार्डधारक अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, भूसुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, अत्यल्प व अल्प लाभार्थी भाग घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूकांनी आपल्या गावातील कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.