नवी दिल्ली: गाझियाबाद येथील एका वृद्धाला मारहाण झाल्यानंतर प्रक्षोभक व जातीय तेढ निर्माण करणारे ट्विट केल्याबद्दल दिल्लीच्या टिळक मार्ग पोलीस ठाण्यात अभिनेत्री स्वरा भास्कर, ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी तसेच इतर काही लोकांविरोधात तक्रार दाखल झाली आहे.
गाझियाबादच्या लोणी भागात एका दाढीवाल्या वृद्धाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. व्हिडिओमध्ये करण्यात आलेल्या दाव्यांत तथ्य नसल्याचे स्थानिक पोलिसांनी तपासाअंती सांगितले होते.
सोशल मीडियावरही या विषयावरून गदारोळ चालू आहे. या प्रकरणात काही लोकांनी प्रक्षोभक व जातीय तेढ वाढविणारे ट्विट केल्याचे सांगत ॲडव्होकेट अमित आचार्य यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेले नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
विशेष म्हणजे गाझियाबाद पोलिसांनी यापूर्वीच ट्विटरविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. दरम्यान काँग्रेसच्या वादग्रस्त टूलकिटवरून दिल्ली पोलिसांनी ट्विटरचे एमडी मनीष माहेश्वरी याची गेल्या महिन्यात चौकशी केली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बंगळूर येथे जाऊन पोलीस पथकाने ही चौकशी केली होती.