अकोला– वादळासारख्या नैसर्गिक आपत्तीत उन्मळून पडलेल्या वृक्षांचे पुनर्लागवड करण्याचा प्रयत्न वृक्ष क्रांती मिशन तर्फे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे यशस्वी करण्यात आला.
याबाबत वृक्ष क्रांती मिशनचे अध्यक्ष नाथन यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या आवारात वादळाने अंदाजे ४० वर्ष वयाचे मंकी ट्री (काजनास पिन्नात ) या जातीचा वृक्ष उन्मळून पडला. याबाबत डॉ.संजय भोयर यांनी दिली. त्यानुसार नाथन, डॉ. माने, डॉ. हर्षवर्धन देशमुख, डॉ. एस. एस. हर्णे यांनी पडलेल्या झाडाची पाहणी केली व झाड कोठे स्थलांतरित करून लावायचे ते ठिकाण ठरविण्यात आले. वृक्ष उचलून नेण्यासाठी क्रेन व जे.सी.बी यंत्राची व्यवस्था करण्यात आली. त्या नंतर कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनात ६ x ६ x ६ फूट आकाराचा खड्डा खणून, त्यात चांगली माती, पाला पाचोळा, ट्रायकोडर्मा बुरशी नाशक,सुडोमोनास ह्याचे कल्चर मातीत मिसळून एक फुटाचा चांगल्या मातीचा थर केला. त्यानंतर शास्त्रीय पद्धतीनं झाडाच्या एक चर्तुर्थांश फांद्यांची छाटणी करण्यात आली व नंतर क्रेनच्या साहाय्याने पूर्ण झाड काळजीपूर्वक उचलून सरळ उभे करून खड्ड्यात ठेवण्यात आले. त्यानंतर झाडाच्या तुटलेल्या मुळांना बुरशी लागू नये म्हणून बाविस्टीन पाण्यात मिसळून ते मिश्रण झाडाच्या तुटलेल्या मुळांना लावण्यात आले. त्यानंतर परत बुरशीनाशक मिश्रीत माती खड्ड्यात टाकून खड्डा भरण्यात आला. झाड मजबुतीने उभे राहावे म्हणून झाडाचे बुंध्यापाशी, मातीचा भर देण्यात आला. नंतर झाडा भोवती भरखते व पाणी देण्याच्या हेतून मोठे आळे करण्यात आले व नंतर झाडाला टँकरने भरपूर पाणी देण्यात आले. तसेच मुळांची वाढ चांगली व्हावी म्हणून ह्यूमिक ॲसिड पाण्यात मिसळून रिंग पद्धतीनं ड्रेंचिंग करण्यात आले, सोबतच झाडांना नवीन पालवी फुटावी म्हणून सिंगल सुपर फोस्फटचा डोस मातीत मिसळून टाकण्यात आला. झाडाची ही पुनर्लागवड करण्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील शास्त्रज्ञ डॉ. सुधीर वडतकर, डॉ. शामसुंदर माने, डॉ. ययाती तायडे, डॉ. हर्षवर्धन देशमुख , डॉ. संजय कोकाटे यांचे तांत्रीक सहाय्य लाभले. या उपक्रमासाठी वृक्ष क्रांती मिशनचे श्रीमती विद्याताई पवार , विजय कुमार गडलिंगे, गोविंद बलोदे, पांडे, तुंबडी, पृथ्वीराज चव्हाण व कु. विशाखा निंगोत ह्यांचे साहाय्य लाभले.
अशा प्रकारे वादळाने वा अन्य कारणाने उन्मळून पडलेल्या वृक्षाचे तसेच विकास कामे वा अन्य कारणाने वृक्ष तोडावयाचा असल्यास वृक्ष उन्मळून पडल्यानंतर शक्य तितक्या लवकर व वृक्ष तोडावयाचा असल्यास त्या आधीच वृक्ष क्रांती मिशनच्या अकोला शहरातील आगरकर विद्यालयाच्या आवारातील कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन नाथन यांनी केले आहे. त्यासाठी त्यांचा संपर्क क्रमांक ७०३८४७६८६१ हा आहे.