अकोला – काटेपूर्णा बॅरेज प्रकल्पामुळे अंशतः बाधित होणाऱ्या मौजे जांभा बु. ता. मुर्तिजापूर च्या नवीन गावठाण जागेवरील भूखंडांचा ताबा प्रकल्पबाधितांना आज राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आले.
पुनर्वसित गावातील जनसुविधांची कामे त्वरित पूर्ण करा, असे निर्देशही ना.कडू यांनी यावेळी यंत्रणेला दिले. यावेळी विधान परिषद सदस्य आ. गोपीकिशन बाजोरिया, आ.अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आ.नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त निमा अरोरा, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपजिल्हाधिकारी भूसंपादन सदाशिव शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, कार्यकारी अभियंता काटेपूर्णा बॅरेज प्रकल्प श्रीराम हजारे यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी प्रभाकर इंगळे, रमेश बावने, रविंद्र इंगळे,श्रीमती उषाबाई गजानन इंगळे, सुमेध इंगळे, अरविंद इंगळे, निलेश भटकर इ. प्रकल्पबाधितांना भूखंड वाटप करण्यात आले. कार्यकारी अभियंता हजारे यांनी यावेळी प्रकल्पाची माहिती सादर केली. त्यात पुनर्वसित गावांमधील जनसुविधांची कामे त्वरित पूर्ण करावीत, असे निर्देश ना.कडू यांनी यावेळी दिले.