अकोला : दिवसेंदिवस प्रशासकीय यंत्रणा ‘हायटेक’ करण्याचा प्रयत्न शासनस्तरावरून केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता वाहन चालविण्याचे लर्निंग लायसन्स काढण्याकरिता आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज राहणार नसून घरातूनच हा परवाना मिळविता येणार आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटकाळात प्रशासकीय कार्यालयांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी विविध स्वरूपातील कामकाज ऑनलाइन पद्धतीने हाताळण्यात आले. नागरिकांनादेखील आता त्याची जणू सवय झालेली आहे. दरम्यान, परिवहन अधिकारी प्रशासनाकडूनही अधिकांश कामे ऑनलाइन पद्धतीने करण्यावर विशेष भर दिला जात आहे. वाहन चालविण्याचा कायमस्वरूपी परवाना मिळविण्यापूर्वी लर्निंग लायसन्स काढावे लागते. त्यासाठी अर्जदाराला ठरावीक संकेतस्थळावर अर्ज करताना आधार क्रमांक नोंद करावा लागणार आहे. त्यानंतर अर्जदाराचे नाव, पत्ता व स्वाक्षरी आधार डेटा बेसमधून परिवहन या संकेतस्थळावर येणार आहे. अर्जदाराची ओळख आणि रहिवासी पत्त्याची वेगळी खातरजमा करण्याची यामुळे आवश्यकता राहणार नाही.
शिकाऊ (लर्निंग) तसेच कायमस्वरूपी (पर्मनन्ट) परवान्याबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास विशिष्ट कोटा देण्यात आलेला आहे. यात दुचाकी व चारचाकी वाहन परवान्यांसाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविली जात आहे. अकोल्याच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात दररोज ६० ते ७० लायसन्स दिले जात आहेत.
तर जावे लागेल आरटीओ कार्यालयात
यापुढे वाहन चालविण्याकरिता आवश्यक लर्निंग लायसन्ससाठी घरबसल्या ऑनलाइन परीक्षा देता येणार आहे; मात्र ज्यांच्याकडे अद्याप आधारकार्ड नाही किंवा कोणाला ऑनलाइन परीक्षा द्यायची नसेल तर संबंधितांना आरटीओ कार्यालयात जाऊन परीक्षा देता येणार आहे.
असा करा ऑनलाइन अर्ज
आतापर्यंत शिकाऊ, कायमस्वरूपी परवान्याकरिता ज्या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करावा लागतो, अपॉइंटमेंट घ्यावी लागते, त्याच संकेतस्थळावर लर्निंग लायसन्ससाठी अर्ज करून चाचणी देता येणार आहे.
संकेतस्थळावर उमेदवाराला त्याचा आधार क्रमांक नोंद करावा लागेल. नाव, पत्ता आणि स्वाक्षरी ही माहिती आधार डेटाबेसमधून परिवहन विभागाला मिळणार आहे. अर्जदाराला घरबसल्या शिकाऊ वाहन परवाना चाचणी देता येईल.
वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना काढण्याबाबतची चाचणी ऑनलाइन पद्धतीने देऊन वाहनचालकांना स्वत: प्रिंट काढता येणार आहे. नव्या वाहनाच्या नोंदणीसाठी निरीक्षकांना शोरूममध्ये जाण्याची गरज राहणार नाही. याबाबत अद्याप अधिक सविस्तर माहिती प्राप्त झालेली नाही; मात्र पुढील आठवड्यात ही नवी पद्धत अमलात येण्याची दाट शक्यता आहे.
– ज्ञानेश्वर हिरडे
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अकोला