अकोला- माझे गाव कोरोना मुक्त या अभियानाअंतर्गत कोरोनाचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी प्रतिबंधात्मक नियम पाळण्यासोबतच गावातील 45 वर्षांवरील व दिव्यांगाचे 100 टक्के लसीकरण प्राधान्याने करण्यात आले. कापशी ग्रामस्थांनी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा जाणून घेतली खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी. आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कापसी येथील सरपंच अंबादास उमाळे यांच्याशी संवाद साधला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियंत्रण करण्यासाठी गावपातळीवर केलेल्या उपाययोजनांबाबत सरपंचांशी दूरदृष्यप्रणालीव्दारे संवाद साधला. त्यात अकोला जिल्ह्यातील कापशीचे सरपंच अंबादास उमाळे यांचाही समावेश होता. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मुर्तिजापूर तालुक्यातील मधापूरीचे सरपंच प्रदीप ठाकरे, कापसीचे सरपंच अंबादास उमाळे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना सरपंच अंबादास उमाळे यांनी गावात कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनासह त्रिसुत्रीय नियमाचे (सामाजिक अंतर, हात स्वच्छ धुणे, मास्क लावणे) पालन केले. घरोघरी सॅनीटायझर, मास्क व रोग प्रतिकारक शक्तीवर्धक औषधांचे वाटप करण्यात आले. गावात रक्तदान शिबिर आयोजित करून रक्त संकलन केले. गावातील परिस्थिती हाताळण्यासाठी ग्रामस्तरीय समिती स्थापन करुन वॉर्डनिहाय प्रतिबंधात्मक नियमाचे पालन केले. बाहेरुन येणाऱ्या व्यक्तीच्या चाचण्या केल्या तसेच त्यांना विलगीकरणात ठेऊनच गावात प्रवेश देण्यात आला. त्यासाठी गावात लोकवर्गणीतून सुसज्ज आयसोलेशन केंद्र उभारण्यात आले. या ठिकाणी औषधोपचाराची व्यवस्था केली. आयसोलेशन ठेवण्यात आलेल्या रुग्णांना मनोबल वाढवा यासाठी केंद्रावर ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, अंगणवाडी व आशासेविकांच्या ड्युट्या लावल्या. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी गावातील खाजगी डॉक्टरच्या सहाय्याने लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांचा संपर्क करुन त्यांचे चाचण्या केल्या जात. यामुळे कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यास मदत झाली.
लसीकरणाबाबत नागरिकांचे गैरसमज दूर करुन लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळाला. गावातील 45 वर्षांवरील पात्र सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. तसेच दिव्यांग व्यक्तीचे 100 टक्के लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. प्रशासन व नागरिकांचे चांगले सहकार्यामुळे कोरोना मुक्त गाव मोहिम ठेवण्यास मदत झाली. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेकरीता आरोग्य सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या असून गाव कोरोना मुक्त ठेवण्याचा निर्धार सरपंच उमाळे यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना व्यक्त केला.