अकोला : पावसाळ्यात तसेच वादळात वीज कोसळून होणाऱ्या हानीसंदर्भात आगाऊ सूचना देणारे ‘दामिनी’ हे मोबाईल ॲप हवामान शास्त्र विभागाने विकसित केले आहे. वीजप्रवण क्षेत्रात काय करावे?, काय करू नये? याबाबत हे ॲप मार्गदर्शक ठरणार आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अभय यावलकर यांनी याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून जिल्हास्तरावर वीज कोसळून होणाऱ्या हानीसंदर्भात करावयाच्या उपाययोजनांबाबत सूचना केल्या आहेत.
आयआयटीएम पुणे या संस्थेकडून दामिनी ॲप विकसित करण्यात आले आहे. वीज कोसळणाची माहिती या ॲपवरून पंधरा ते वीस मिनिटअगोदर मिळू शकणार आहे. तहसील कार्यालयाने तालुक्यातील सर्व पोलीस पाटील व कोतवालांना दामिनी ॲप डाऊनलोड करण्यासंबंधी व नागरिकांना सूचना देण्याचे आदेश दिले आहेत.
सध्या पावसाने अनेक तालुक्यात हजेरी लावलेली आहे. शेतकऱ्यांना व शेतमजुरांना कामानिमित्त व पेरणीच्या कामासाठी शेतात राबावे लागते. यावेळी कोसळणाऱ्या विजामुळे गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात चार मृत्यू झालेले असून तालुक्यात सुद्धा एका मृत्यूची नोंद झाली आहे. वीज पडून होणारे मृत्यू रोखण्याकरिता पुणे येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरोलॉजी (आयआयटीएम) या संस्थेकडून ‘दामिनी’ हे ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून पंधरा ते वीस मिनिटे अगोदर विजांचा कडकडाट कुठे होईल? विजा कुठे पडतील? याचा अंदाज ॲपवर देण्यात येणार असल्यामुळे नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचण्यासाठी मदत होणार आहे. याबाबत देशात चाळीस सेंन्सर्स बसविण्यात आले आहेत. याॲपमध्ये अजून नवीन फिचर देऊन विजा पडण्याची निश्चित वेळ सुद्धा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना देखील या ॲपचा फायदा होणार आहे.
या ॲप तालुक्यातील ९१ पोलीस पाटील आणि ३५ कोतवालांनी गुगल प्ले स्टोअरमधून त्वरित डाऊनलोड करून घ्यावे व नैसर्गिक आपत्तीच्या काळात पूर येणे, वीज पडणे अशा वेळेस व इतर वेळेस आवश्यकता वाटल्यास आपल्या गावातील नागरिकांना सतर्क करावे, यासोबतच नागरिकांनी देखील हे ॲप डाऊनलोड करावे, यासाठी सूचना केल्या आहेत. आरोग्य सेतू ॲप ज्याप्रमाणे जीपीआरएस प्रणालीद्वारे आपणास आपल्या आजूबाजूला किती कोरोना संक्रमित रुग्ण आहेत याची माहिती देते. तसेच संक्रमित रुग्णांचा संपर्क रोखण्यासाठी सुचित करते. त्याच धर्तीवर ‘दामिनी’ हे ॲप विकसित करण्यात आले आहे.