अकोला- जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाच्या सद्यस्थिती व उपाययोजना तसेच ऑक्सीजन प्लांट, संभाव्य लाटेच्या अनुषंगाने बालकांकरीता केलेल्या उपाययोजनाबाबत आज आढावा घेतला. संभाव्य लाटेकरीता प्रशासनाने उपाययोजना राबवून प्रशासन व आरोग्य व्यवस्था सज्ज ठेवावी,असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात कोविड-19 संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ना. ऍड. ठाकूर बोलत होत्या. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार नाना पटोले, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त निमा अरोरा, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजकुमार चव्हाण,निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, वैद्यकीय महाविद्यालयाचे उपधिष्ठाता डॉ.कुसूमाकर घोरपडे, डॉ.सिरसाम, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, माजी आमदार बबनराव चौधरी, प्रकाश तायडे, मदन भरगड, आदि उपस्थित होते.
यावेळी ॲड. यशोमती ठाकूर यांनी कोरोना रुग्ण स्थिती, रुग्णांना देण्यात येणाऱ्या सोईसुविधा याबाबत माहिती घेतली. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने कोविड रुग्णाकरीता बेड तसेच ऑक्सीजन व व्हेटीलेटर बेडची संख्या वाढवावी, तसेच बालकांसाठी राखीव बेड ठेवावे, ऑक्सीजनचा तुटवडा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्राधान्याने 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करुन घ्यावे. तसेच कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांचे पालनपोषण व संरक्षण करण्याचे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी दिले.