देशात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येत्या काही महिन्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान यामध्ये लहान मुलांसाठी विशेष दक्षता घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवरच गुरुवारी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून लहान मुलांना कोरोना संकटात सांभाळताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करताना काही नियमांबदल बदल करत नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. नवीन नियमानुसार स्टेरोईडचा वापर, रेमडीसीवीरचा वापर तसेच ते मास्क कसा घालावा याबाबतही माहिती देण्यात आली आहे.घरातील लहान मुले देखील कोरोना संकटात सुरक्षित ठेवण्याची मोठी जबाबदारी त्यांचे पालक आणि आरोग्य यंत्रणेवर आहे.
दरम्यान नव्या नियमावलीमध्ये 5 वर्षांखालील मुलांना मास्क नको असे स्पष्ट करण्यात आले आहे. तर, वय वर्ष 6 ते 11 यांनी पालक आणि डॉक्टरांच्या निगराणीखाली मास्कचा वापर करावा तसेच 18 वर्षां खालील मुलांना अॅन्टिवायरल ड्रग रेमडीसीवीर टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याऐवजी परिस्थिती पाहून एचआरसीटी इमेजींग चा योग्य वापर करून कोरोनाचे निदान करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.
कोरोनाच्या लक्षणे नसलेल्या तसेच सौम्य लक्षणे असणार्या मुलांना स्टेरॉइईड्स न देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ज्या मुलांना स्टेरॉईड दिली जातील ती योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात दिली जावीत असे देखील सूचित करण्यात आले आहे. सोबतच कटाक्षाने स्वतःहून सेल्फ़ मेडिकेशन म्हणून स्टेरॉईडचा वापर देखील टाळा असे सूचवण्यात आले आहे. एचआरसीटी स्कॅन स्कोअर देखील उपचार पद्धतीसाठी नसावा. उपचार हे पूर्णपणे लक्षणांची तीव्रता पाहून ठरवण्यासाठी असल्याचे केंद्रा कडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान भारतामध्ये अद्याप 18 वर्षांखालील कोणत्याही वयोगटासाठी कोरोना लसीकरण मंजूर करण्यात आलेले नाही. सध्या कोवॅक्सिन कडून याबाबतची चाचपणी सुरू आहे. सध्या त्याच्या क्लिनिकल ट्रायल्स सुरू असून लवकरच त्याला देखील हिरवा कंदील देण्याचा प्रयत्न आहे.