अकोला : आजपासून शहरातील दक्षिण झोन सोडून इतर सर्व झोनच्या प्रभागातील पडीक वार्ड पद्धतीने होणारी साफसफाई बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या खाजगी कंत्राटदारामार्फत होणारी सफाई बंद होणार आहे. या विषयीचा निर्णय महापालिका आयुक्त निमा अरोरा यांनी घेतला. या निर्णयामुळे सफाई कामगार कामावर न लावता देयके काढणार्या काही नगरसेवकांची अडचण होणार आहे.
प्रत्येक पडीक वार्डात स्वच्छता करण्यासाठी दरमहा एक लाख रुपये खर्च करण्यात येतो. अचानक पडीक वार्ड बंद केल्याने या प्रभागातील नगरसेवकांसह ठेकेदारांना धक्का बसला आहे. 1 जूनपासून पडीक वार्ड बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. पूर्व, पश्चिम तथा उत्तर झोनमधील सर्व 31 पडीक वार्ड बंद होणार आहेत. तर दक्षिण झोनमधील काही प्रभाग नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुरु राहणार आहेत. या निर्णयामुळे काही नगरसेवकांच्या वरकमाईचे मोठे साधन बंद होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. अकोला महानगरपालिकेत 51 पडिक भागांची निर्मिती केली होती. प्रत्येक महिन्यात पडीक वार्डाच्या नावावर प्रतिवार्ड 98 हजार रुपयांचे बिल काढण्यात येत होते. आता 31 पडीक वार्ड बंद केल्याने मनपाची दरमहा सुमारे 31 लाख रुपयांची बचत होणार आहे.