बीजिंग: जवळपास दीड वर्षांपूर्वी चीनच्या वुहानमधून करोनाचा संसर्ग जगभरात फैलावला होता. दीड वर्षानंतरही करोनाच्या संसर्गाला पूर्णपणे अटकाव करण्यास शक्य झाले नाही. अशातच आता चीनमधून आणखी एक संकट जगावर ओढावण्याची भीती आहे. चीनमध्ये एका व्यक्तीला बर्ड फ्लूच्या विषाणूची बाधा झाल्याचे समोर आले आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने याला दुजोरा दिला आहे.
चीनच्या झेनजियांगमधील एका ४१ वर्षीय व्यक्तीला बर्ड फ्लूच्या H10N3 या विषाणूची बाधा झाली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीला २८ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर एका महिन्यानंतर २८ मे रोजी या व्यक्तीच्या शरिरात H10N3 हा स्ट्रेन आढळला. या व्यक्तीला H10N3 ची बाधा कशी झाली याबाबत आरोग्य आयोगाने कोणतीही माहिती दिली नाही.
चिंतेचे कारण नाही?
H10N3 हा स्ट्रेन आढळल्याने चिंतेचे कारण नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. H10N3 स्ट्रेन अधिक शक्तिशाली नाही, शिवाय त्याचा धोकाही कमी आहे. एनएचसीने सांगितले की, या विषाणूच्या स्ट्रेनमुळे फारसा धोकाही संभवत नाही. त्याशिवाय या विषाणूचा स्ट्रेन मोठ्या प्रमाणावर फैलावण्याचा धोकाही कमी असल्याचे त्यांनी सांगितले.
संसर्गबाधित व्यक्तीची प्रकृती स्थिर असून लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना बाधा झाली नसून त्यांना कोणताही त्रास झाला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
चीनमध्ये बर्ड फ्लूचे अनेक स्ट्रेन आहेत. त्यातील काही स्ट्रेनची व्यक्तींनाही बाधा झाली आहे. पोल्ट्रीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तिंना बर्ड फ्लूच्या स्ट्रेनची बाधा होण्याची शक्यता अधिक असते. H10N3 स्ट्रेन हा जगातील इतर कोणत्याही देशांतील व्यक्तीमध्ये आढळला नाही.