देशभरातील विविध भागांमध्ये जून महिन्यात सर्वसाधारण पावसाचा अंदाज हवामान विभागाने आयएमडी वर्तवला आहे. पूर्व भारतासह, मध्य भारत, हिमालय तसेच मध्य भारताचा पूर्वेकडील भागामध्ये मान्सूनचा पाऊस सर्वसाधारण राहील. तर, उत्तर पूर्व भागात, दक्षिण भारतातील दख्खनचे पठार, उत्तर पूर्वेकडील काही भागात सरासरीच्या सर्वसाधारण स्थितीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने मंगळवारी वर्तवला आहे.
विभागाकडून नैऋत्य मोसमी वाऱ्याबद्दलचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे. आयएमडीने यंदाचा मान्सून सरासरीच्या १०१ टक्के असेल असा अंदाज वर्तवला आहे. यानुसार यंदा मान्सून सामान्य राहणार आहे. यंदा सरासरीच्या १०० टक्के पाऊस होईल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. देशात जून ते सप्टेंबर या काळात मान्सून सरासरीच्या सामान्य राहील. ९६ ते १०४ टक्क्यांपर्यंतच्या पावसाची सामान्य मान्सून मध्ये गणना केली जाते.
उत्तर-पश्चिम भारतात ९२ ते १०८ टक्के पाऊस
आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनचा पाऊस उत्तर पश्चिम भारतात ९२-१०८ टक्के होण्याची शक्यता आहे. तर, दख्खनच्या पठारावर ९३-१०७ टक्के पाऊस होऊ शकतो. उत्तर पूर्व भारतात ९५ टक्के, तर मध्य भारतात १०६ टक्के पेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जून महिन्याच्या शेवटी जुलै महिन्याचा पावसाचा अंदाज आयएमडीकडून वर्तवण्यात येणार आहे. नैऋत्य मोसमी वारे ३ जूनला केरळमध्ये दाखल होतील . हवामान विभागाने यापूर्वी १ जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला होता.
कसे असेल यंदाचे पर्जन्यमान?
स्कायमेटच्या अंदाजानुसार जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चार महिन्यांत सरासरीच्या तुलनेत २०२१ मध्ये १०३ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये ५ टक्के कमी किंवा अधिक असू शकते. पावसाळ्याच्या प्रादेशिक कामगिरीवर स्कायमेटचा अंदाज आहे की उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागांत संपूर्ण हंगामात पाऊस पडण्याची शक्यता आहे.