महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी यंदाची दहावीची परीक्षा अखेर रद्द झाली आहे. त्यावर शिक्कामोर्तब करून शिक्षण विभागाने दहावीचा निकाल कसा तयार करायचा याचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. त्यानुसार नववी आणि दहावीतील अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
कोरोना मुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीत सर्वसमावेशक असे धोरण तयार करताना विभागातील तज्ञ, मुख्याध्यापक, शिक्षक, लोकप्रतिनिधी, पालक संघटना, तंत्रज्ञान कंपन्या यांच्याशी सुमारे २४ विविध बैठकांद्वारे चर्चा केली आहे. सर्व घटकांशी सखोल चर्चा करून दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणदान करण्याबाबतचे धोरण निश्चित केले आहे. या मूल्यमापन धोरणानुसार विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मूल्यमापन करण्यात येईल. नववी-दहावी साठी सुधारित मूल्यमापन योजना शासन निर्णय दि.०८ ऑगस्ट २०२१ नुसार निश्चित करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांचे दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन ३० गुण, विद्यार्थ्यांचे दहावीचे गृहपाठ / तोंडी परीक्षा / प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन २० गुण, विद्यार्थ्यांचा नववीचा विषयनिहाय अंतिम निकाल ५० गुण याप्रमाणे विषयनिहाय एकूण १०० गुण इ. ९ वी संपादणूक यासाठी ५० % भारांश आणि इ.१० वी संपादणूक यासाठी ५० % भारांश) ठरविण्यात आला आहे.
मूल्यमापन धोरण करताना विद्यार्थ्यांची कोविड १९ पूर्व काळातील (सामान्य) परिस्थितीमधील) संपादणूक पातळीही विचारात घेतली गेली आहे. सध्या दहावीत असलेल्या विद्यार्थ्याच्या मागील वर्षीचा (इ.९ वीचा निकाल कोविडपूर्व वस्तुनिष्ठ मूल्यमापनावर आधारित आहे. सरल प्रणालीवर या निकालाची नोंद आहे. ज्या विद्यार्थ्यांना वरील पद्धतीने तयार केलेला निकाल समाधानकारक वाटत नसेल त्यांना कोरोनाची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेअंतर्गत यापुढील लगतच्या दोन परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध असेल.
विद्यार्थ्यांच्या निकालाचे नियमन करण्यासाठी शाळास्तरावर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यांची निकाल समिती असेल. या निकालपत्रांच्या अभिलेखांची पडताळणी विभागीय स्तरावर शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून करण्यात येईल. शाळास्तरावर गैरप्रकार अथवा अभिलेख यामध्ये फेरफार झाल्यास दंडात्मक कारवाई याची तरतूद करण्यात आली आहे. मंडळामार्फत जून २०२१ अखेर निकाल घोषित करण्याचे नियोजन आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांची मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल. सर्व शाळांनी या वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करावे. असे देखील शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
दहावी निकालाचा फॉर्म्युला दृष्टीक्षेपात
▶️ प्रत्येक विषयांचं १०० गुणांचं मूल्यमापन होणार
▶️ नववीच्या गुणाचे ५० टक्के गुण ग्राह्य धरणार
▶️ मूल्यमापनावर आक्षेप असल्यास कोरोनानंतर परीक्षा
▶️ लेखी मूल्यमापनासाठी ३० गुण, प्रात्यक्षिक मूल्यमापनासाठी २० गुण
▶️ प्रत्येक विषयासाठी १०० गुणांचं मूल्यमापन
▶️ जून महिन्याच्या अखेरीस निकाल जाहीर करणार