नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला देशात दररोज कोरोनाचे ४ लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत होते. आता हाच आकडा २ लाखांच्या जवळपास पोहोचला आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र त्याचवेळी ब्लॅक फंगसचा (mucormycosis) धोका वाढत आहे. म्युकरमायकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगसबद्दल सोशल मीडियावर विविध प्रकारची माहिती शेअर केली जात आहे.
ब्लॅक फंगस कसा पसरतो, त्याच्यापासून बचाव करण्यासाठीचे उपाय काय यासंदर्भात सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल झाली आहे. कांद्यांवर दिसणारा काळा थर आणि फ्रिजमध्ये दिसणारा काळा थर ब्लॅक फंगस असल्याचा दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे. मात्र वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी यात कोणतीच तथ्य नसल्याचं सांगितलं. कांद्यावरील किंवा फ्रिजमधील काळ्या थराचा ब्लॅक फंगसच्या आजाराशी काहीही संबंध नसल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
फ्रिजमध्ये जमा होणारा काळा थर, कांद्यावर दिसून येणारा काळा थर आणि ब्लॅक फंगस पूर्णपणे वेगळे आहेत. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, mucormycosis एक ब्लॅक फंगस नाही आणि ब्लॅक फंगसचं नावच मुळात चुकीचं आहे. कारण ब्लॅक फंगस काळ्या रंगाची नसते. ब्लॅक फंगसची लागण झाल्यावर शरीरातील रक्तपुरवठा थांबतो. त्यामुळे त्वचेवर काळ्या रंगाचे डाग येतात. त्यामुळे याला ब्लॅक फंगस म्हटलं जात असावं. याचं खरं नाव mucormycosis आहे.
स्टेरॉईड्स हे mucormycosisचा धोका वाढण्यामागचं प्रमुख कारण असल्याचं डॉ. गुलेरियांनी सांगितलं. ‘एखादी व्यक्ती बऱ्याच कालावधीपासून स्टेरॉईड्स घेत असेल किंवा त्या व्यक्तीला मधुमेहासारखा आजार असल्यास तिला फंगल इंफेक्शनचा धोका असतो. त्यामुळे अशा व्यक्तींना अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. त्यांनी मधुमेह नियंत्रणात ठेवायला हवा. या आजाराला रोखण्यासाठी वेगानं काम करण्याची गरज आहे,’ असं डॉक्टर म्हणाले.