अकोला : शेतीतील प्रयोगशीलतेला प्रोत्साहन व कृषी उत्पादकतेत भर घालण्यासाठी कृषी विभागामार्फत पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, अधिकाधिक शेतकरी बांधवांनी सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ( Crop Competition Maharashtra 2021 details )
पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव करणे व कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळवणे हा उद्देश ठेवून कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.
या खरीप हंगामापासून पुर्वीच्या पिकस्पर्धेच्या निकषांमध्ये शिथिलता आणि सुयोग्य बदल करुन नव्याने स्पर्धा राबविण्यात येत आहे. सध्याच्या पीकस्पर्धेतील महत्वाच्या बाबींनुसार, पिकस्पर्धेसाठी पिकनिहाय तालुका हा एक घटक आधारभुत धरण्यात येईल. खरीप हंगामासाठी स्पर्धेतील समाविष्ट पिके – ( Crop Competition Maharashtra Eligible Crops)
भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी ), तुर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल असे एकूण 11 पिके आहेत.
प्रति तालुका किमान स्पर्धक संख्या- सर्वसाधारण गटासाठी 10 व आदिवासी गटासाठी 5 असावेत. पीकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीचे शेतावर त्यापिकाखाली किमान 10 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पुरेसे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पीकस्पर्धा संबंधित तालुका कृषी अधिकारी जाहीर करतील. तालुक्यात पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या – सर्वसाधारण गटासाठी 05 व आदिवासी गटासाठी 04 असेल. स्पर्धेत भाग घेणा-या शेतकर्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. सर्व गटासाठी पीकनिहाय प्रत्येकी रक्कम 300 रुपये प्रवेश शुल्क आहे.
मूग व उडीद पीकासाठी 31 जुलैपर्यंत, तर भात, ज्वारी,बाजरी, मका, नाचणी (रागी ), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल यासाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे. पीक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांचे अर्ज विहित नमुन्यामध्ये भरून त्यासोबत ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चलन, 7/12, 8अ चा उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) या कागदपत्रांची पूर्तता करून कृषि कार्यालयात द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पीकस्पर्धा विजेत्यांसाठी बक्षीसे ( Crop Competition Prizes for Winners)
अ.क्र | स्पर्धा पातळी | सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिस रुपये | ||
पहिले | दुसरे | तिसरे | ||
1 | तालुका पातळी | 5,000 | 3,000 | 2,000 |
2 | जिल्हा पातळी | 10,000 | 7,000 | 5,000 |
3 | विभाग पातळी | 25,000 | 20,000 | 15,000 |
4 | राज्य पातळी | 50,000 | 40,000 | 30,000 |
पिकस्पर्धेच्या मार्गदर्शक सुचना कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहाय्यक / कृषी पर्यवेक्षक / तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ( How to apply for Crop Competition Maharashtra 2021)
रब्बी हंगाम २०२० मध्ये पिकस्पर्धेसाठी राज्यातील शेतक-यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याप्रमाणे खरीप हंगाम २०२१ साठी देखील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मूग व उडीद पिकांसाठी ३१ जुलै पुर्वी तर इतर खरीप पिकांसाठी ३१ ऑगस्ट पुर्वी अर्ज सादर करुन पिकस्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी आयुक्तांनी केले आहे.