अमरावती (Amravati) जिल्ह्यातील परतवाडा येथील भामकर कोविड हॉस्पिटलमध्ये (Covid Hospital) रुग्णाकडून अधिक पैसे घेवून त्यांना पक्के बिल न देता कच्चे बिल देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णांकडून आर्थिकलूट होत असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकानी केला आहे.
अमरावती जिल्ह्यातील पांढरी येथील रामदास आवारे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांना 16 मे रोजी परतवाडा येथील भामकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ज्यावेळी दाखल केले त्यावेळी रुग्णाचा HRCT स्कॅन स्कोर 12 होता. मात्र 4 दिवसाच्या उपचारानंतर रुग्णाचा स्कोर 19 एवढा वाढला. त्यामुळे भामकर हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित उपचार होत नसल्याचा आरोप रुग्णांची मुलगी रुपाली आवारे यांनी केला.
रुपाली यांनी त्यांच्या वडिलांना अमरावती येथील PDMC रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्याचे ठरविले मात्र त्यावेळी भामकर हॉस्पिटलने 57 हजार रुपये बिल जमा करण्यास सांगितले. यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांना कोणत्याही प्रकारचे बिल न देता साध्या वहीच्या कागदार हिशेब लिहून दिल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
सध्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून केली असून भामकर हॉस्पिटलकडून लूट झाली आहे. सोबतच अनेक रुग्णांची त्या हॉस्पिटलकडून लूट होत आहे, असा आरोप करत कारवाईची मागणी केली आहे. मात्र, भामकर हॉस्पिटलने या प्रकरणावर सारवासारव करत ऐनवेळी बिल मागितल्याने कागदावरच बिल दिल्याचे डॉ. हेमंत चिमोटे यांनी सांगितले.
कॅश ने बिल घेणे, कमी रक्कमेची बिल देणे असे प्रकार जिल्ह्यात सर्रास घडत आहे, यामुळे रुग्णांची मात्र लूट होत आहे. जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढायला लागल्याने रुग्णांची तारांबळ उडू नये वेळीच उपचार मिळावा यासाठी खाजगी कोविड रुग्णालयास परवानगी देण्यात आली. काही खाजगी रुग्णालय रुग्णांवर व्यवस्थित उपचार करतात. मात्र काही रुग्णालयात मात्र रुग्णांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जाते. याबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामुळे आता रुग्णांची लूट करणाऱ्या खाजगी रुग्णालयावर जिल्हाधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.