मान्सून अंदमानमध्ये पोहचला आहे. तो गोव्यात 5 जूनपर्यंत पोहोचेल. यंदा राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस कोसळेल, असे प्रतिपादन हवामान तज्ज्ञ आणि राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेचे माजी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रमेश कुमार यांनी केले. त्यांनी दै. ‘पुढारी’शी संवाद साधला.
ते म्हणाले, दरवर्षीपेक्षा एक दिवस आधीच म्हणजे 31 मे रोजी मान्सून केरळात दाखल होईल. केरळ ते भारताच्या उत्तर पश्चिम भागात संपूर्ण उपखंडात मान्सून व्यापण्यासाठी 45 दिवसांचा कालावधी जातो. सध्याची मान्सूनची व्यापकता पाहता मान्सून गोवा राज्यात 5 जून रोजी दाखल होण्याची शक्यता आहे. नैऋत्य मान्सूनच्या पावसाचा प्रारंभ दक्षिण अंदमान आणि निकोबार बेटांच्या गटात आणि त्यानंतर मान्सूनने, बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील दिशेने प्रगती केली आहे. केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची तारीख 1 जून आहे. मात्र यावर्षी तो एक दिवस आधीच दाखल होण्याची शक्यता आहे.
ते पुढे म्हणाले, 2013 साली मान्सूनला भारतीय उपखंड व्यापण्यासाठी 45 ऐवजी 16 दिवस लागले होते. 2002 साली मान्सूनने 76 दिवसात भारतीय उपखंड व्यापला होता. मान्सूनची स्थिती आणि व्यापकतेचा कालावधी वर्षागणिक बदलत आहे.
ते म्हणाले, राज्यात सध्या जोराचा वारा सुटतो आहे, तसेच विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी बरसत आहेत. हे वातावरण मान्सूनच्या आगमनासाठी पोषक असून आगमनाची चाहूल देणारे आहे.
मान्सूनचे महत्त्व
भारतीय उपखंडासाठी नैऋत्य मान्सून हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. आणि त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मान्सूनच्या पावसाला म्हणजेच जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणार्या पावसाला खूप महत्त्व आहे. वार्षिक पावसातील सरासरी 60 ते 90 टक्के पाऊस या कालावधीत पडतो.