बुलडाणा : बुलडाण्यातील (Buldana) जळगाव जामोदमधील (Jalgaon Jamod) धानोरा महासिद्ध याठिकाणी दोन भाच्यांसह मामाचा धरणात बुडून मृत्यू झाला. सोमवारीच ही घटना घडली असून मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. फिरायला चालल्याचे सांगून गेल्यानंतर रात्री उशिरापर्यंत तिघं परतले नाही, त्यामुळं शोध घेतला असता हा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळं गावावर शोककळा पसरली आहे.
या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये विनायक गाडगे, तेजस गाडगे आणि त्यांचे मामा नामदेव गाडगे यांचा समावेश आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार 27 वर्षीय विनायक हा नोकरीच्या निमित्ताने मुंबईत असतो. पण सध्या लॉकडाऊन असल्यानं तो गावी धानोऱ्याला आला होता. त्याच्यासोबत त्याच्या काकाचा मुलगा तेजसही गावी आलेला होता. त्यांचे मामा म्हणजे 43 वर्षीय नामदेव वानखेडे हे मलकापूरहून आलेले होते. कुटुंबामध्ये होणाऱ्या एका लग्नसमारंभासाठी बहिणीला घेऊन जायला नामदेव आलेले होते.
सध्या लॉकडाऊन असल्याने कुठं बाहेर जाणं किंवा फिरणं शक्य नाही म्हणून नामदेव यांच्यासह विनायक आणि तेजस धानोरा येथील लघु प्रकल्पावर फिरण्यासाठी गेले होते. उन्हाळ्याचा कडाका असल्यामुळं धरणात पोहोचण्याची इच्छा झाली आणि त्यासाठी ते पोहण्यासाठी पाण्यात उतरले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कारण मंगळवारी सकाळी काठावर या तिघांचे कपडे आणि इतर साहित्य आढळून आलं.
रात्री खूप उशीर होऊनही तिघे घरी परतले नाही, त्यामुळं सर्वांना चिंता व्हायला लागली. त्यामुळं सगळीकडे त्यांची शोधाशोध सुरू करण्यात आली. मात्र जवळपास कुठेही सापडले नाही, यामुळं पोलिसांना याची माहिती देण्यात आली. दरम्यान धरण परिसरात शोध घेण्यासाठी काही लोक गेले होते. त्यांना काठावर कपडे आणि मोबाईल फोनसह साहित्य आढळून आलं. त्यानंतर सर्वांना याबाबत सांगितलं. पण रात्रीच्या अंधारात नेमकं कुठं शोध घ्यायचा हेही समजत नव्हतं.
सकाळी शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी या तिघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळले. त्यानंतर काही स्थानिकांच्या मदतीनं तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. हे तिघे पोहायला गेले याबाबत इतरक कोणालाही माहिती नव्हती. तसंच कोणी पाहिलं असण्याचीही शक्यता नसल्याने नेमकं काय झालं हे मात्र कळू शकलेलं नाही. पण अशाप्रकारे बुडून तिघांचा मृत्यू झाल्यानं परिसरात शोककळा पसरली आहे.