मुंबई: 19 मे: टू-डीऑक्सी-डी-ग्लुकोज (2-deoxy-D-Glucose) अर्थात टू-डीजी (2-DG) या भारतात विकसित केलेल्या कोरोनावरील औषधाच्या पहिल्या बॅचचं लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंहआणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सोमवारी 17 मे रोजी केलं. मध्यम ते तीव्र स्वरूपाचा कोविड असलेल्या रुग्णांमध्ये त्या औषधाचाआपत्कालीन स्थितीत वापर करण्यासाठी औषध महानियंत्रकांनी (DCGI) एक मे रोजी परवानगी दिली होती. लवकरच कोरोना रुग्णांच्या उपचाराच्या प्रोटोकॉलमध्येही या औषधाचा समावेश करण्याचा सरकारचा विचार आहे.
नवी दिल्लीतील इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर मेडिसीन अँड अलाइड सायन्सेस (INMAS) ही संस्था म्हणजे संरक्षण संशोधन विकास संघटनेची (DRDO) प्रयोगशाळा आहे. हैदराबादमधील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज (Dr. Reddy’s Laboratories) या औषध कंपनीच्या सहकार्याने ‘इन्मास’ने हे औषध विकसित केलं आहे, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने या महिन्याच्या सुरुवातीला दिली होती.
कोविड-19मुळे (Covid19) हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या रुग्णांना लवकर बरं वाटण्यास तसंच त्यांचं कृत्रिम ऑक्सिजनवरचं अवलंबित्व कमी होण्यास या औषधामुळे मदत होत असल्याचं क्लिनिकल ट्रायल्समध्ये आढळल्याचं सरकारी प्रसिद्धी पत्रकात म्हटलं होतं.
कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेवेळी एप्रिल 2020 मध्ये INMAS-DRDO या संस्थेने हैदराबादच्या सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (CCMB) या संस्थेच्या सहकार्याने प्रयोगशाळेत काही प्रयोग केले. त्यात असं लक्षात आलं, की हे औषध कोरोना विषाणूच्या वाढीला प्रतिबंध करून कोविड रुग्णांना बरं करण्याचं काम प्रभावीपणे करतं.
हे वाचा – कोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश
मे 2020 मध्ये DCGI च्या सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने कोविड-19रुग्णांमध्ये टू-डीजी या औषधाच्या दुसऱ्या टप्प्यातल्या क्लिनिकल ट्रायल्सघेण्यास मंजुरी दिली. DRDO आणि इंडस्ट्री पार्टनर DRL यांनी मे ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत 110 कोविड रुग्णांवर या औषधाच्या चाचण्या घेतल्या. दुसऱ्या टप्प्यातल्या दोन टप्प्यांपैकी पहिल्या टप्प्यात सहा हॉस्पिटल्स, तर दुसऱ्या टप्प्यात 11 हॉस्पिटल्समध्ये या चाचण्या घेण्यात आल्या. दुसऱ्या टप्प्यातल्या चाचण्या औषधाची सुरक्षितता आणि कोविड रुग्णांवर दिसणारा प्रभाव तपासण्यासाठी घेण्यात आल्या. हे औषध सुरक्षित असून रुग्णांना लवकर बरं वाटण्यास त्याचा चांगला उपयोग होत असल्याचं या चाचण्यांत आढळलं.
या चाचण्या यशस्वी झाल्याचे निष्कर्ष हाती आल्यानंतर DCGI ने नोव्हेंबर 2020 मध्ये या औषधाच्या तिसऱ्या टप्प्यातल्या क्लिनिकल ट्रायल्सना (Clinical Trials) परवानगी दिली. डिसेंबर 2020 ते मार्च 2021 या कालावधीत दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांतल्या एकूण 27 हॉस्पिटल्समधल्या 220 रुग्णांवर या औषधाच्या चाचण्या घेण्यात आल्या.
सध्याच्या निश्चित उपचारपद्धतीच्या तुलनेत या औषधाच्या वापरामुळे रुग्ण अडीच दिवस लवकर बरा होत असल्याचं आढळून आलं. रूढ उपचार पद्धतीच्या वापराने रुग्णाचं कृत्रिम ऑक्सिजनवरचं अवलंबित्व तिसऱ्या दिवशी 31 टक्के कमी होतं. या औषधाच्या वापरामुळे ते तिसऱ्या दिवशी 42 टक्के कमी झाल्याचं तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांत आढळलं. 65 वर्षांवरच्या रुग्णांमध्येही हाच कल दिसून आला.
हे औषध विषाणूचा संसर्ग झालेल्या पेशींमध्ये गोळा होतं आणि व्हायरल सिंथेसिस अर्थात विषाणूच्या संश्लेषणाची आणि ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया थांबवून विषाणूच्या वाढीला प्रतिबंध करतं. विषाणूचा संसर्ग झालेल्या पेशींमध्ये नेमकेपणाने जाणं, हे या औषधाचं वेगळेपण असल्याचं पत्रकात म्हटलं आहे. त्यामुळे हे औषध कोविडच्या गंभीर रुग्णांना दिलासा देणारं ठरणार आहे.
सरकारच्या म्हणण्यानुसार, टू-डीजी हे जेनेरिक औषध असून ग्लुकोजचा अॅनालॉग आहे. त्यामुळे ते सहज तयार करता येऊ शकतं आणि मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देता येऊ शकतं. हे औषध पावडर स्वरूपात सॅशेमध्ये उपलब्ध असून ते पाण्यात विरघळवून प्यायचं आहे.