नवी दिल्ली: कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या 2 डीजी औषधाचे लाँचिंग संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. 2 डिओक्सि-डी-ग्लुकोज अर्थात 2 डीजी औषध (2-deoxy-D-glucose drug) डीआरडीओच्या वैज्ञानिकांनी विकसित केले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी औषधाचा पहिला बॅच (10 हजार डोसेस) केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांना दिला.
कोविड – 19 संसर्गाने सध्या जगभरात हाहाकार उडविलेला आहे. या पार्श्वभूमीवर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच डीआरडीओच्या अखत्यारितील इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाईड सायन्सेसने कोरोनावर प्रभावी ठरणारे 2 डीजी औषध विकसित केले आहे. हाइड्रॉक्सी क्लोरोक्विन, रेमडिसिविर, आइवरमेक्टिन यासारखी औषधे कोरोना संसर्गावर कितपत उपयुक्त ठरतात, यावर गेल्या वर्षभरापासून संशोधन सुरु आहे. मात्र ‘2 डीजी’ कडे अँटी कोविड औषध म्हणून पाहिले जात आहे.
2 डीजी विकसित करण्यात हैदराबादस्थित डॉ. रेड्डीज लॅबरेटरीज कंपनीने देखील महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. या कंपनीकडूनच 2 डीजी चे उत्पादन केले जाणार आहे. हे औषध पावडरच्या स्वरूपात असणार आहे. गेल्या वर्षी कोरोनाची पहिली लाट आली होती, त्या वेळपासून इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाईड सायन्सेसने 2 डीजी वर संशोधन सुरु केले होते. मे 2020 मध्ये ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने या औषधाच्या कोविड रुग्णांवरील टप्पा 2 च्या ट्रायलला मंजुरी दिली होती. हे ट्रायल ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरू होते. कोरोना रुग्णांसाठी हे औषध सुरक्षित असून रिकव्हरीमध्येही ते मदत करते, असे संशोधनातून दिसून आले होते.
सकारात्मक निष्कर्षानंतर 2 डीजी च्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलला परवानगी देण्यात आली होती. अखेर 9 मे रोजी ड्रग कंट्रोलरने या औषधाच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली होती. 2 डीजी हे अणुचे परिवर्तित रूप आहे. याद्वारे ट्यूमर, कॅन्सर पेशींवरही उपचार होऊ शकतो. कोरोनाने बाधित असलेल्या रुग्णांची ऑक्सिजनवरील निर्भरता कमी करण्याचे काम 2 डीजी करते. सेकंडरी औषधाच्या रुपात वापर करण्यास 2 डीजी ला परवानगी देण्यात आली आहे. हे औषध जवळपास ग्लुकोजसारखे असते, पण ते ग्लुकोज नसते.