तेल्हारा( प्रतिनिधी): कोरोना या जागतिक महामारीने संपूर्ण जग हादरलेले असून त्याचा मुकाबला मागील दीड वर्षांपासून सुरू आहे. आपल्या भारतातही केंद्र सरकार, राज्य सरकार, संपूर्ण शासकीय आणि खासगी आरोग्य यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा, जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस, आणि सर्वच प्रकारचे फ्रंट लाईन वर्कर, आणि देशाची एकशे तीस कोटी जनता आपल्या जीवाची पर्वा न करता आपआपले कर्तव्य चोख बजावत असून कोरोनाची पहिली लाट यशस्वीरित्या थोपविली आहे. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले असून त्याची तीव्रता इतकी जास्त आहे की देशात दररोज हजारो जण आपले प्राण गमावित आहेत. देशात सर्वत्र ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन, रुग्णवाहिका, डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, मूलभूत सुविधा इत्यादी इतक्या अपुर्या पडत आहेत की त्याची पूर्तता करण्यात रुग्णाच्या नातेवाईकांची आणि आरोग्य यंत्रणेची पूर्णतः दमछाक होत आहे.
आता वरिष्ठ तज्ञांनी कोरोनाची तिसरी भयावह लाट येण्याचे खात्रीशीर सूतोवाच केले आहे. याचा विपरीत प्रभाव लहान मुलांवर पडण्याची गंभीर शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तिसऱ्या लाटेची संभाव्य भीषणता पाहता ज्याप्रमाणे आकस्मिक युद्धाच्या वेळेस सैन्यदल कमी पडू नये म्हणून सामान्य नागरिकांना सुद्धा सैनिकी प्रशिक्षण देउन देशसेवेची जबाबदारी दिली जाते बिलकुल त्याच प्रकारे शिक्षक, सर्व शासकीय कर्मचारी, तरुण, युवक वर्ग, स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते, जागरूक नागरिक, इत्यादींना प्रथम उपचार करणे, ऑक्सिजन मास्क लावणे, रक्ताचे सॅम्पल घेणे, बी.पी., शुगर चेक करणे, तज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधी वाटप, कोरोना प्रतिबंधक जनजागृती अशा प्रकारचे तात्काळ प्रशिक्षण देणे जेणेकरून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाणार नाही. आणि पर्यायी मनुष्यबळ उपलब्ध होईल. स्थानिक स्तरावरील खाजगी डॉक्टरांना आरोग्य केंद्रात काही निर्धारित तासांपर्यंत आळीपाळीने सेवा देणे बंधनकारक करावे.
बहुतांश खाजगी कोविड रुग्णालये लुटमारीचा अड्डा झाली असून शासनाने तात्काळ सर्व खाजगी कोविड रुग्णालये, कोविड केयर सेंटर्स यांची सेवा अधिग्रहित करावी. किंवा सर्वत्र खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांचे उपचार बिलकुल मोफत करणे बंधनकारक करावे. त्यासाठी झालेला खाजगी रुग्णालयांचा वास्तविक व खरा खर्च जसे की साहित्य खरेदी, सर्जिकल आयटम्स, औषधे, इत्यादींचा मोबदला ठोक बाजार भावाप्रमाणे त्यांना शासनाकडून देण्यात यावा. खासगी डॉक्टरांनी मागच्या 5 वर्षांच्या बॅलन्स शीट मध्ये दरवर्षी सरासरी जेवढा नफा दाखविला असेल तेवढेच मानधन त्यांना देण्यात यावे. आणि सर्व कोरोना रुग्णांवर मोफत उपचाराचा कायदा अमलात आणावा अशी मागणी जोर धरत आहे.
दुसरीकडे कोरोना निर्बंधातही जाणीवपूर्वक आणि वारंवार विना मास्क फिरणाऱ्या युवकांना जवळच्या कोरोना उपचार रुग्णालय आणि कोविड केअर सेंटर्स मध्ये कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी सक्तीने डॉक्टरांच्या मार्गदर्शनात एक महिना सेवा देणे बंधनकारक करावे. त्यामुळे त्रिस्तरीय फायदे निश्चितच होणार आहेत.
येणाऱ्या काळात रुग्णवाहिकांची कमी भासणार असल्याने निवडणुकी प्रमाणे खाजगी गाड्यांना शासनाकडून भाडेतत्त्वावर उपलब्ध करून द्यावे. प्रत्येक आरोग्य केंद्रांमध्ये किमान 3 गाड्या आणि प्रत्येक लहान खेडेगावात किमान 1 वाहन हजर ठेवावे. रुग्णांना सदर वाहन निशुल्क मिळावे.
विकेंद्रीकरणाचे धोरण ठरवून हिवरखेड येथेही सुविधा द्याव्यात
हिवरखेड आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयात चा दर्जा द्यावा. हिवरखेड येथील 40 हजार लोकसंख्या आहे. आणि जवळपास ची 50 गावे मिळून एक लक्ष लोकांच्या आरोग्याचा भार हिवरखेड आरोग्य केंद्रावर आहे. त्यामुळे कोविड नियंत्रणात आणण्यासाठी जनतेच्या महत्वाच्या सूचना शासनाने लक्षात घेऊन मागण्या मान्य करणे अपेक्षित आहे. कोरोना ची तिसरी लाट थोपविण्यासाठी ज्याप्रकारे सर्व तालुक्यात ऑक्सिजन प्लांट, आणि कोव्हीड सेंटर्स मंजूर आहेत. त्याचप्रमाणे हिवरखेड येथे ऑक्सिजन प्लांटची तात्काळ निर्मिती करावी आणि रुग्णांना लांब पल्ल्याच्या ठिकाणी हलविण्याची आवश्यकता पडू नये म्हणून परिसरातील सर्व गावांसाठी मिळून हिवरखेड येथे कमीत कमी पन्नास ते शंभर खाटांचे कोविड सेंटर सुरू करण्यात यावे. कोविड सुविधांसाठी जागेची व्यवस्था करण्यात कोणतीही अडचण येणार नाही अशी हमी हिवरखेडच्या सरपंच सौ सीमाताई राऊत यांनी दिली आहे.
हिवरखेड येथे लसीचा साठा अत्यंत कमी मिळतो आणि इच्छुकांची संख्या मोठी असल्याने गोंधळ उडत आहे. त्यामुळे मोठ्या लोकसंख्येचा विचार करून तातडीने संपूर्ण लसीकरण महत्त्वाचे असल्याने तात्काळ कोव्हीशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा. आरोग्य केंद्रात येणाऱ्या संभाव्य रुग्णांसाठी आणि गृह विलगीकरणात असणाऱ्या कोरोना रुग्णांसाठी आवश्यकता भासल्यास तातडीची उपाययोजना म्हणून कमीत कमी 10 ते 20 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध करून द्याव्यात. जेणेकरून ऑक्सिजन अभावी कोणाचा मृत्यू होणार नाही.
हिवरखेड येथे दोन 108 रुग्णवाहिकांची नितांत आवश्यकता आहे परंतु येथे एकही 108 रुग्णवाहिका नाही ज्यामुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. त्यामुळे तात्काळ दोन 108 रुग्णवाहिका उपलब्ध करून द्याव्यात. रुग्णवाहिका नसल्यास निवडणुकी प्रमाणे खाजगी गाड्यांना शासनाकडून भाडेतत्त्वावर उपलब्ध करून द्यावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि हिवरखेड विकास मंच चे संयोजक धिरज बजाज आणि आदर्श पत्रकार संघामार्फत करण्यात आली आहे.