अकोट : चाईल्ड पोर्नोग्राफीवर प्रतिबंध असताना अकोट तालुक्यातील सावरा येथील एका महिलेने बालकांचे लैंगिक चित्रीकरण इन्स्टाग्रामवर अपलोड केल्याचे निष्पन्न झाले आहे. हा गुन्हा घडल्याचे राष्ट्रीय स्तरावरील यंत्रणेने स्पष्ट केल्यानंतर या प्रकरणी अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये पहिलाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची माहिती अशी की, महाराष्ट्र सायबर मुंबई यांच्याकडून अकोला पोलीस अधीक्षकांना सीलबंद एचपी डिव्हिडीसह पत्र प्राप्त झाले. या पत्रात फेसबुक, इंस्ट्राग्राम यांच्या मार्फतीने बाल अश्लीलता संदर्भात इंटरनेटवर कोणकोणत्या भारतातील युजर्सने व्हिडिओ शेअर केले. त्याबाबत टिपलाइन पुराव्यासह (आय.पी. ॲड्रेस, युजर्स नेम, शेअर व्हिडिओ) माहिती पुरविली गेली होती. त्यामध्ये अकोला जिल्ह्याच्या लोकेशनवरून एकूण पाच टिपलाइन्स पोर्नोग्राफीसंदर्भात शेअर केल्याचे लक्षात आल्याने पोलीस अधीक्षकांनी कार्यवाही करण्यासंदर्भात आदेश दिले होते. या पत्रातील सदर टिपलाइन्सचे केलेल्या अधिक चौकशीत इन्स्टाग्रामवर विक्की अग्रवाल हे नाव धारण करणारे आणि चौकशीत मोबाईल धारणकर्ता अकोट तालुक्यातील सावरा येथील एक महिला असल्याचे समोर आले.
या महिलेने बालकांचे लैंगिक चित्रीकरण फाइल इन्स्टाग्रामवर इंटरनेटचा वापर करून सेंड करून अपराधास्पद कृत्य केल्याचे निष्पन्न झाले. या महिलेने तिच्या मालकीच्या मोबाईलचा वापर करून इन्स्ट्राग्राम अकाऊंटवरून एचपी डिव्हिडीमध्ये नमूद असलेले लहान मुलाचे/बालकांचे अश्लील/कामुक चित्रण हे इंटरनेट वापरून अँटोनिया सिल्वा यांच्यासोबत नीतीभ्रष्ट कृत्य हस्तांतरित केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशानुसार सायबर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे यांच्या तक्रारीनुसार अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये सावरा रहिवासी एका महिला आरोपींविरुद्ध भांदवि कलम २९२, सहकलम कलम ६७ (ब) अधिनियम २००० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पॉर्न पाहणाऱ्यांच्या संख्येत वाढ
देशात टाळेबंदी लागू झाल्यापासून चाईल्ड पॉर्न, सेक्सी चाईल्ड आणि टीन सेक्स व्हिडिओ यांसारखे शब्द इंटरनेटवर टाकून त्यातून वेबसाईट पाहणाऱ्यांची संख्या वाढली आहे, अशी धक्कादायक माहिती ऑनलाईन डाटा मॉनिटरिंग वेबसाईट्सच्या अहवालातून समोर आली आहे. पोर्नहब या जगातील सर्वात मोठ्या पोर्नोग्राफी वेबसाइटवरील आकडेवारीवरून टाळेबंदीपूर्वी चाईल्ड पोर्नोग्राफी पाहण्याचे सरासरी प्रमाण आता तुलनेने २४ ते २६ मार्च दरम्यान ९५ टक्क्यांनी वाढले असल्याचे निरीक्षण भारतीय बाल संरक्षण निधीने (आयसीपीएफ) नोंदविले आहे.