वॉशिंग्टन : कोरोना संक्रमणापासून बचाव करण्यासाठी मास्क नेहमीच उपयुक्त ठरला आहे. मास्कचे प्रकार आणि वेगवेगळ्या मास्कच्या संक्रमण रोखण्याच्या क्षमतेवर अनेक रिपोर्ट आलेले आहेत. अशावेळीच आता अमेरिकेच्या ‘सेंटर्स फॉर डीसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन’ (सीडीसी)ने मास्कबाबत एक नवी माहिती दिली आहे. ‘सीडीसी’च्या म्हणण्यानुसार एकाच मास्कऐवजी दोन मास्क परिधान करणे हे संक्रमण रोखण्यासाठी अधिक परिणामकारक ठरत आहे. त्यालाच ‘डबल मास्किंग’ म्हटले जाते.
असे डबल मास्किंग शरीरात जाणार्या संक्रमणाच्या ड्रॉपलेटस्ना रोखण्यासाठी 90 टक्के परिणामकारक ठरते. जर आपण घरीच असाल तर एकच मास्क पुरेसा आहे. तसेच ज्याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेतली जात आहे अशा ठिकाणी गेल्यावरही एकच मास्क पुरेसा आहे. मुलांना कधीही डबल मास्क परिधान करू नये. जर डबल मास्क परिधान केल्यावर श्वास कोंडल्यासारखे वाटत असेल तर एकच मास्क परिधान करावा. दोन सर्जिकल मास्क एकावर एक परिधान करू नयेत. तसेच ‘एन 95’ मास्कच्या वर दुसरा मास्क परिधान करू नये. दोन कापडी मास्क किंवा सर्जिकल मास्कवर एक कापडी मास्क परिधान करणे योग्य ठरते. वर्दळीच्या, गर्दीच्या ठिकाणी जायचे असेल तर डबल मास्क परिधान करावा. प्रवास करताना तसेच ज्याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही अशा ठिकाणीही डबल मास्क परिधान करणे लाभदायक ठरते. डबल मास्क ड्रॉपलेटस् रोखण्यासाठी 85.4 टक्के परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे.