मुंबई : राज्यात कोरोनामुळे हाहाकार सुरु आहे. राज्यात कडक निर्बंध लागू करूनही गर्दी नियंत्रणात येत नसल्याने आणि त्यामुळे कोरोनाचे संकट आणखी गंभीर झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गुरुवारी (दि. 22) रात्री 8 पासून राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात आता दोन जिल्ह्यांत आणि शहरांत प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी लग्न समारंभासाठी 50 जणांना परवानगी देण्यात आली होती. आता केवळ 25 जणांच्या उपस्थितीत आणि फक्त दोन तासांत लग्न उरकावे लागणार आहे.
मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी बुधवारी लॉकडाऊनची नियमावली जाहीर केली. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वच मंत्र्यांनी कडक लॉकडाऊनची मागणी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याबाबत घोषणा करतील, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, मुख्य सचिवांनी लॉकडाऊनची नियमावली जाहीर केली. नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती प्रकरणाने 24 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जनसंवाद टाळला आणि लॉकडाऊनच्या मार्गदर्शक सूचना मुख्य सचिवांच्या सहीने मदत व पुनर्वसन विभागाने जारी केल्या.
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन संसर्गाची साखळी तोडण्यासाठी 22 एप्रिल रोजी रात्री 8 वाजल्यापासून ते 1 मे सकाळी 7 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. आंतरजिल्हा व आंतरशहर प्रवासाचे निर्बंध कठोर केले असून, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व शासकीय कर्मचार्यांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.
सरकारी कार्यालयांत 15 टक्के उपस्थिती
सर्व सरकारी कार्यालयांमध्ये केवळ 15 टक्के कर्मचारी हजर राहू शकणार आहेत. यात कोरोना नियंत्रणातील अत्यावश्यक सेवेला सूट देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचार्यांना उपस्थित रहाता येणार आहे. मात्र, आवश्यकतेनुसार या ठिकाणी 100 टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येणार आहेत.
खासगी कार्यालयात 15 टक्के उपस्थितीस परवानगी…
खासगी कार्यालयांमध्ये 5 कर्मचारी किंवा 15 टक्के कर्मचार्यांनाच हजर राहता येणार आहे.
दोन तासात उरका लग्न; अन्यथा 50 हजार दंड….
लग्नासाठी एका हॉलमध्ये 25 जणांनाच परवानगी देण्यात आली आहे, तसेच फक्त 2 तासांची वेळमर्यादा दिलेली आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास 50 हजार रुपये दंडसुद्धा वसुल केला जाणार आहे.
खासगी वाहतूक 50 टक्के क्षमतेने…
प्रवासात जिल्हा व शहर बंदीचा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे. खासगी वाहतुकीसाठी चालकासह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. जिल्ह्याबाहेर किंवा दुसर्या शहरात अत्यावश्यक गरजेसाठीच प्रवास करता येईल.
शहराबाहेर जाताना जिल्हाधिकार्यास याची माहिती द्यावी लागेल. तसेच सर्व प्रवाशांच्या हातावर 14 दिवस क्वारंटाईनचा शिक्का मारला जाईल. त्याची जबाबदारी ही वाहन धारकावर राहणार आहे.
प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येईल. तापमान अधिक असल्यास संबंधीताला थेट कोरोना काळजी केंद्रात पाठवण्यात येईल. तसेच प्रवाशांचे रॅपीड अँटीजेन चाचण्या करण्यात येतील. त्याचा खर्च प्रवासी किंवा वाहन धारकाने करायचा आहे.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांना मुभा…
राज्य, केंद्रीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचर्यांना मोनो, मेट्रो, लोकल यांचा उपयोग त्यांच्या ओळखपत्रावर करता येईल. डॉक्टर, प्रयोगशाळा कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, पॅरामेडीकल कर्मचारी तसेच आरोग्य कर्मचारी यांना ओळखपत्रावर प्रवासास मुभा असेल. वैद्यकीय कारणासाठी तसेच दिव्यांग जणांना आणि सोबत एका व्यक्तीस प्रवास करण्यास मुभा आहे.
राज्य व स्थानिक प्राधिकरणाच्या बसेस 50 टक्के क्षमतेने धावतील. एकाही प्रवासी उभा असणार नाही.
अत्यावश्यक दुकानांच्या वेळा सकाळी 7 ते 11 पर्यंतच…
औषध दुकाने व वैद्यकीय सेवा वगळता भाजीपाला, डेअरी, किराणा मालाची दुकाने, बेकरी दुकाने ही 13 एप्रिल रोजी जाहीर केलेल्या आदेशानुसार सकाळी 7 ते 11 पर्यंतच सुरू राहतील. मात्र, त्यांना घरपोच सेवा देण्याची परवानगी असेल.