अकोला: कोरोनाची साखळी तोडण्याचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. बाजारात गर्दी होणार नाही यासाठी अत्यावश्यक सेवेत येणारी दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. किराणा, दुध डेअरी, भाजीपाला विक्रीची दुकाने सुरु आहेत. शहरात मुख्य भाजी मंडीत गर्दी होणार नाही यासाठी नगरपालिका प्रशासनाने जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार शहरात सहा ठिकाणी भाजीपाला विक्रीची दुकाने सुरु केली आहेत.
या दुकानदाराना कोरोनाचे नियम पाळणे बंधनकारक केले आहे. मात्र किराणा, भाजीपाला खरेदीच्या नावावर बाजारपेठेत होणारी गर्दी कायम दिसत असल्याने कोरोनाचा संसर्ग कमी होत नाही. यासाठी आता बाजारात होणारी गर्दी कमी करण्यासाठी किराणा, दुध डेअरी भाजीपाला विक्रिवर निर्बंध लावण्यात आले आहेत. नवीन नियमाप्रमाणे ही दुकाने सकाळी सात ते अकरा या वेळात सुरु राहणार असल्याने त्याची अंमलबजावणी केली जात आहे.
बुधवारी शहरातील विविध किराणा दुकानासमोर ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच शहरात ठिकठिकाणी असलेल्या भाजी मंडीत देखील गर्दी झाली होती.
जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याचे दृष्टीने याआधीच्या निर्बंधांबाबतच्या आदेशामधील अत्यावश्यक बाबीतील आस्थापना, कार्यालय आता सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू राहतील. परंतु दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री (डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी), घरपोच दुधविक्री सकाळी ७ ते ११ व सायंकाळी ५ ते ७ यावेळेत सुरू राहिल, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत.
यामार्गदर्शक सूचना मंगळवारी (ता. २०) रात्री आठ वाजेपासून अंमलात येतील. निश्चित करण्यात आलेल्या वेळा ह्या व्यक्ती तसेच संस्थांसाठी लागू राहतील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. हे आदेश जिल्ह्यात १ मे २०२१ च्या सकाळी ७ वाजेपर्यत लागू राहतील.