अकोला,दि. 19- येत्या सण उत्सवांच्या काळात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणुन कलम 36 अन्वये पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी जिल्ह्यातील पोलीस फौजदार व त्यापेक्षा वरीष्ठ अधिकारी यांना अधिकार प्रदान केले आहेत. हे आदेश दि. 21 ते 27 या कालावधीसाठी असुन प्रदान करण्यात आलेले अधिकार खालीलप्रमाणे आहेत.
रस्त्यावरुन जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोक कशा रितीने चालतील त्यांची वर्तणुक कशी असावी? याविषयी निर्देश देणे, मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी उपासनेच्या सर्व जागेचे आसपास, उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्याने किंवा सार्वजनिक जागी किंवा लोकाच्या एकत्र जमण्याच्या जागी गर्दी होणार असेल किंवा अडथळा निर्माण होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा होवू न देणे. अशा कोणत्याही मिरवणुका ज्या मार्गाने जाव्यात किंवा ज्या मार्गाने जावू नयेत ते विहीत करणे, सर्व रस्त्यावर व नद्यांचे घाटावर आणि सार्वजनिक स्नानाचे, कपडे धुण्याचे, उतरण्याचे ठिकाणी, जागेमध्ये देवालय, किंवा इतर सार्वजनिक किवा लोकांच्या जाण्या-येण्याच्या जागेमध्ये बंदोबस्त व सुव्यवस्था राखणे.
कोणत्याही रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ वाद्य वाजविण्याचे किंवा गाण्याचे किवा ढोल ताशे, शिट्टया व इतर कर्कश वाद्य वाजविणे वगैरेबाबत नियम तयार करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे, कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किवा सार्वजनिक उपहाराच्या(अतिथीगृहाच्या) जागेत, ध्वनीक्षेपकाचा उपयोग करण्याचे नियम करणे व त्यावर नियंत्रण करणे, सक्षम अधिकाऱ्यांनी हया अधिनियमांचे कलम 33,36,37 ते 40, 42, 43 व 45 अन्वये केलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे.