कोरोना व्हायरसाचा वाढता प्रादुर्भाव पाहता JEE (मेन्स) ची परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही परीक्षा 27, 28 आणि 30 एप्रिल रोजी घेण्यात येणार होती. परंतु, आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजंसी (NIA)ने दिलेल्या माहितीनुसार, जेईई परीक्षांच्या नव्या तारखेची घोषणा परीक्षेच्या कमीत कमी 15 दिवसांआधी करण्यात येईल.
कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य लक्षात घेता देशभरात अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या असून काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून बारवीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच महाराष्ट्रातही दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशातच आता एप्रिलमध्ये होणारी परीक्षा JEE Main’s ची परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, देशभरातील जवळपास 6 लाख विद्यार्थी इंजिनिअरिंग प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या या परीक्षेसाठी बसणार होते. मार्चच्या अटेम्पटमध्ये परीक्षेत 6,19,638 विद्यार्थी सहभागी झाले होते. तर फेब्रुवारीच्या अटेम्पटमध्ये 6.52 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केला होता.
दरम्यान, JEE मेन्स, बीई, बीटेकसह आयआयआयटी, एनआयटी आणि इतर अनके अभ्यासक्रमांसाठी ही परीक्षा देशभरातून अनेक विद्यार्थी देतात. जे विद्यार्थी JEE मेन्समध्ये उत्तीर्ण होतात आणि 2.5 क्रमांकापर्यंत येतात. त्यांना आयआयटीमध्ये प्रवेशासाठी जेईई अॅडवांस प्रवेश परीक्षेसाठी सिलेक्ट केलं जातं. गेल्या वर्षीही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती.