नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ होत आहे. देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज विक्रमी नोंद होत असून मृत्यूदरातही वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 2 लाख 61 हजार 500 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर कोरोनामुळे 1 हजार 501 बाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात दिलासा देणारी बाब म्हणजे, गेल्या 24 तासांत देशात 1,38,423 लोकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. शुक्रवारी 234,692 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. यापूर्वी कोरोनाच्या पहिल्या लाटेत 15 सप्टेंबर रोजी सर्वाधिक 1 हजार 290 रुग्णांचा मृत्यू झाला होता.
महाराष्ट्रातही आज सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांची आकडेवारी धडकी भरवणारी असून आज 67 हजार 123 नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. आज 56 हजार 783 कोरोनाबाधित बरे झाले आहेत. एकूण 30 लाख 61 हजार 174 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज 419 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 59 हजार 970 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण 6 लाख 47 हजार 933 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.18 टक्के झाले आहे.
तर गेल्या 24 तासात मुंबईत 8 हजार 811 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मुंबईत आतापर्यंत 4 लाख 71 हजार 80 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 86 हजार 433 आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासनाने केलेली नियमावली, उपाययोजना यांची वस्तुनिष्ठ माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवतानाच माध्यमांनी जनजागृती करावी. साथीच्या आजाराचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हा लढा यशस्वी करूया, असे आवाहन केले.
महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात सर्वाधिक रुग्णवाढ होत आहे. ही रुग्णवाढ थांबविण्यासाठी राज्य शासन अनेक उपाययोजना करीत आहे. नियमावली जाहीर केली आहे. लोकांना त्याविषयी सोप्या भाषेत माहिती देताना कोरोना नियंत्रणासाठी अनावश्यक गर्दी टाळणे, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे या सूचनांचे पालन करणे किती आवश्यक आहे, हे समजून सांगायची आवश्यकता आहे. माध्यमांनी जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.