पातूर शहरातील महात्मा फुले कला व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या सह काही कर्मचाऱ्यांनी संगणमत करून शासकीय निधीची अवैध उचल केली असल्याचा आरोप करणारी तक्रार महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुभाष पांडुरंग बोचरे यांनी पातुर पोलिसात केली असून यातील 11 कर्मचाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे.
यामध्ये या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किशोर वाट ,निशांत सदाफळे, मनोज राऊत ,अमोल सोळंके ,संजयकुमार बोराडे ,पवन काळपांडे, प्रशांत पाटील, विरेंद्रसिंग सोळंके ,पंकज मडघे ,डॉ. गजानन रोडे ,प्रा. योगेश भोसले आदि कर्मचाऱ्यांनी सहसंचालक कार्यालय अमरावती विभाग अमरावती यांचेकडे खोटी वेतन देयके सादर करून शासकीय निधीची अवैध उचल केली असल्याने त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करून त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी संस्थेचे अध्यक्ष सुभाष बोचरे यांनी केली आहे.
शासनाच्या धोरणाप्रमाणे 6 जून 2013 रोजी सदर महाविद्यालय अनुदान तत्वावर आले 6 जून 2013 रोजी पासून पुढे हे महाविद्यालय अनुदानास पात्र ठरले आहे त्यामुळे 6 जून 2013 रोजी पासून महाविद्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान देण्याचे शासनाने मान्य केले असले तरी प्रत्यक्षात नियमित शासकीय वेतन हे माहे नोव्हेंबर 2017 पासून सुरू झालेले आहे आणि माहे नोव्हेंबर 2017 पर्यंत म्हणजे कर्मचाऱ्यांनी नियुक्तीच्या दिनांकापासून माहे ऑक्टोंबर 2017 पर्यंत संस्थेने महाविद्यालय कर्मचाऱ्यांना वेतन दिले आहे त्याची नोंद सुद्धा संस्थेच्या लेखा पुस्तकांमध्ये यातील संबंधित कर्मचाऱ्यांच्या पैसे प्राप्तीच्या स्वाक्षऱ्या सह लेखा परिक्षण सह उपलब्ध असल्याचे श्री सुभाष बोचरे यांनी तक्रारीत नमूद केले आहे असे असताना यातील कर्मचाऱ्यांनी शासकीय कार्यालयाचे कर्मचाऱ्यांशी संगणमत करून संस्थाध्यक्ष यांना अंधारात ठेवून 6 जून 2013 च्या पूर्वीच्या दिनांकापासून वेतन प्राप्तीसाठी पात्र आहे असे खोटे सांगून खोटे थकित वेतन देयक तयार करून ते खरे आहे असे भासवून दिनांक 3 एप्रिल 2021 रोजी शासनाकडून तब्बल 2 कोटी 56 लाख 58 हजार 21 रुपये इतकी सदर राशी महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या खात्यावर बँक ऑफ महाराष्ट्र महात्मा गांधी रोड शाखा अकोला या ठिकाणी जमा आहे.
संस्थेने या आधी वेतन देयके कर्मचाऱ्यांना दिली असताना पुन्हा या कर्मचाऱ्यांनी वेतनाची मागणी करून सदरचे वेतन प्राचार्याच्या खात्यामध्ये जमा करून घेतले आहे ही बाब संस्थेचे अध्यक्ष सुभाष बोचरे यांचे निदर्शनास आल्या वरून त्यांनी ही बाब उघड केली आहे याबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य यांना अध्यक्षांनी सूचना पत्र सुद्धा दिले मात्र या पत्राचे उत्तर उडवाउडवी करणारे आणि वेतनाचे डबल डबल शोधन करण्याच्या अशुद्ध इराद्याने यातील प्राचार्या ने लिहिले असल्याचा आरोप संस्थेचे अध्यक्ष सुभाष बोचरे यांनी तक्रारीत केला आहे.
यातील प्राचार्य आणि इतर कर्मचारी यांना अवैध आर्थिक फायदा व्हावा या हेतूने येथील कर्मचारी यांनी शासकीय कार्यालयाची असलेल्या सलोख्याच्या संबंधाचा फायदा घेऊन संस्थेच्या अध्यक्षा ला कुठल्या प्रकारचे माहिती न देता अंधारात ठेवून शासकीय निर्णयाप्रमाणे दिनांक 6 जून 2013 पासून पुढील कालावधीच्या थकीत वेतन चा लाभ मिळण्यास पात्र असतानाही एप्रिल 2012 पासून च्या दिनांकापासून अवैधरीत्या वेतन थकीत असल्याचे भासवून खोटे वेतन देयक तयार करून शासकीय तिजोरीची 2कोटी 56 लाख 58 हजार रुपये 21 रुपये रक्कम खोटारडेपणा करून मिळवली आहे व ती त्यांच्या बँक खात्यावर जमा आहे त्यामुळे प्राचार्य आणि त्यांना मदत करणारे महाविद्यालयीन कर्मचारी यांनी संगनमत करून केलेल्या शासकीय निधीच्या प्रकरणी दिशाभूल व प्रकरणी भारतीय दंड विधानाच्या कलम 120 कलम 420 ,34 आणि कलम 409 नुसार गुन्हा दाखल करून खोटी देयके तयार करून ती खरी आहे असे दर्शविण्याचा प्रक्रियेतील प्रत्येक घटकास चौकशीत घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करावी आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष सुभाष बोचरे यांनी केली आहे.