मुंबई : चेन्नई सुुपर किंग्सचा (CSK) फास्ट बॉलर दीपक चहरनं (Deepak Chahar) पंजाब किंग्स (Punjab Kings) विरुद्धच्या मॅचमध्ये आयपीएल कारकिर्दीमधील सर्वोत्तम कामगिरी केली. चहरनं पंजाबविरुद्ध 13 रन देत फक्त 4 विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर सीएसकेला या आयपीएलमधील (IPL 2021) पहिल्या विजय मिळवता आला.
मात्र या मॅचपूर्वी ‘तू खेळू नकोस’ असा सल्ला चहरला मिळाला होता. स्वत: चहरनंच याबाबत खुलासा केला आहे.चहरनं दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये साधारण बॉलिंग केली होती. त्यानं दिल्लीविरुद्ध 4 ओव्हरमध्ये 36 रन दिले होते. या दरम्यान त्याला एकही विकेट मिळाली नाही. दिल्ली कॅपिटल्सनं सीएसकेचा सात विकेट्सनं मोठा पराभव केला. या मॅचनंतर चहरनं रुममध्ये आल्यावर सोशल मीडियावरील मेसेज चेक केले. त्यावेळी त्याला एका मुलाचा मेसेज आला होता. “भाई, तू खूप चांगला बॉलर आहेस. पण एक विनंती आहे, पुढची मॅच खेळू नकोस’ असं त्यानं म्हंटलं होतं. स्वत: चहरनंच शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) दिलेल्या मुलाखतीमध्ये हा खुलासा केला आहे.
दीपक चहरनं यावेळी सांगितलं की, “या ठिकाणी अपेक्षा खूप जास्त आहेत. तुम्हाला प्रत्येक मॅचमध्ये चांगली कामगिरी करावी लागते. पंजाब विरुद्धची माजी कामगिरी त्या मुलाला समर्पित करतो. ही मॅच खेळलो नसतो तर मला अशी कामगिरी करता आली नसती, हे त्यानं लक्षात ठेवावं. एखाद्या खेळाडू एक मॅच खराब खेळला तर तुम्ही त्याला मोडीत काढता, त्याला थोडा वेळ द्या,” असं आवाहन चहरनं केलं
पंजाबविरुद्धच्या कामगिरीबाबत चहरनं सांगितलं की, “त्याला मोक्याच्या क्षणी सूर गवसला. टीमसाठी ही मॅच जिंकणे आवश्यक होते. पहिल्या मॅचमध्ये पराभव झाला होता. त्यामुळे एका चांगल्या सुरुवातीची गरज होती. टीमसाठी योगदान देता आलं याबद्दल मी खूप खूश आहे. वानखेडे हे माझं आवडतं स्टेडियम असल्यानं ही कामगिरी माझ्यासाठी आणखी खास आहे, असंही चहरनं यावेळी स्पष्ट केलं.