-
Medical Exam Postponed
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यानंतर आता वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या देखील परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या १९ एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षा आता जूनमध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे.
-
जूनमध्ये घेण्यात येणार परीक्षा
येत्या जूनमध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे, आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही चर्चा झाली आहे, अशी माहितीही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
Medical Exam Postponed काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या एमबीबीएस, बीडीएस आदी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांनी मागणी केली होती. सुरुवातीला या परीक्षा १९ एप्रिल ते ३० जून या दरम्यान घेतल्या जाणार होत्या. मात्र, कोरोनाी वाढती रुग्णसंख्या पाहता या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी विद्यार्थी, लोकप्रतिनिधी आणि संघटनांकडून मागणी होत होती. दरम्यान, या मागणीनुसार आता या परीक्षा जूनमध्ये घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.