अकोला- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमिवर आगामी काळातील सण व उत्सव हे आपल्या घरातच साजरे कर,असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे शांतता समितीच्या बैठकीत केले.
शांतता समितीची बैठक आज जिल्हा नियोजन भवनात पार पडली. यावेळी मनपा आयुक्त निमा अरोरा, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, पोलीस उपअधीक्षक सचिन कदम, तहसिलदार विजय लोखंडे तसेच धर्मगुरु, धार्मिक संस्थांचे प्रमुख आदी उपस्थित होते. आगामी काळात विविध धर्मियांचे प्रमुख सण व उत्सव होणार आहेत. आपले हे सण शांततेत साजरे करावे. या काळात कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोरपालन करावे. जेणे करुन कोरोनाचा फैलाव रोखता येईल.हे सर्व सण व उत्सव घरातूनच साजरे करावे. त्या त्या धर्मगुरुंनी आपापल्या अनुयायांना याबाबत आवाहन करावे,असे आवाहनही जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले.
लोकांनी धैर्याने या कालावधीत प्रतिबंधात्मक उपाय जसे मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, परस्परांमध्ये अंतर राखणे या त्रिसुत्रीचा अवलंब करावा, पूर्ण खबरदारीनिशी आपले सण व उत्सव घरातच साजरे करावे,असे यावेळी आवाहन करण्यात आले.