अकोला: अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. येथे रुग्णांना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत पालकमंत्री व राज्यमंत्री बच्चू कडू यांनी तिथे धडक देत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी एका कर्मचाऱ्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने कडू यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी या कर्मचाऱ्याच्या कानाखाली लगावली.
राज्यमंत्री बच्चू कडू हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. मंत्री झाल्यानंतरही त्यांनी हा आक्रमकपणा सोडलेला नाही. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते थेट दिल्लीच्या सीमेवर धडकले होते. याशिवाय अनेक प्रश्नांवर त्यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटनेची आंदोलनेही होत असतात. आज त्यांचा हाच आक्रमकपणा अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाहायला मिळाला. कडू यांचा रुद्रावतार पाहून तिथे सगळेच हादरले.
अकोला जीएमसी येथे रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याच्या तक्रारी पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडे आल्या होत्या. त्याची कडू यांनी गंभीर दखल घेतली व आज अचानक या वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये व अन्य अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री बच्चू कडू यांनी प्रत्यक्ष जेवणाच्या व्यवस्थेची पाहणी केली असता जेवण पाहून त्यांचा संताप अनावर झाला. वैद्यकीय महाविद्यालयातील गेल्या वर्षभराच्या जेवणाच्या खर्चाचा हिशोबही संबंधितांकडून दाखवण्यात आला नाही. पूर्ण वर्षाचं रेकॉर्डच त्यांच्याकडे नव्हतं. त्यावर कडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर जेवणाच्या दर्जाबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना कडू यांनी विचारणा केली. त्यावर एका कर्मचाऱ्याने कडू यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे कडू यांनी रागाच्या भरात या कर्मचाऱ्याच्या कानाखाली लगावली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
दरम्यान, पालकमंत्री कडू यांनी याआधीही या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाहणी केली होती. त्यावेळी सुद्धा असाच प्रकार त्यांच्या निदर्शनास आला होता. तेव्हाही त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. मात्र, स्थिती अद्याप सुधारलेली नाही. जिल्हा प्रशासन सातत्याने याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. संबंधित अधिकारी व कर्मचारी वारंवार सूचना देऊनही त्या पाळत नसल्याने कडू यांचा संताप झाला आहे. येथे रुग्णांना कशाप्रकारे निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जातं याचे व्हिडिओही व्हायरल झालेले आहेत. मात्र यंत्रणा सुधारत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.