मध्यंतरी सोशल मीडियावर नितीन गडकरी यांचे भाषण व्हायरल झाले होते. नेते आणि त्यांच्या पीए यांच्याबाबत मजेशीर भाष्य त्यात होते. नेत्यांचे पीए म्हणजे चहापेक्षा किटली गरम असा प्रकार असतो असे त्यांचे म्हणणे अनेकांना पटले आणि त्यावर दादही दिली. मात्र, पीए मुरब्बी, मुत्सदी असेल तर काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील. शरद पवार यांचे पीए ते राज्याचे गृहमंत्री असा त्यांचा प्रवास झाला असून राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते अशीच त्यांची ओळख आहे.
महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात येण्याआधी औटघटकेचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडते की काय असे वाटत असताना जयंत पाटील यांच्यासोबत दिलीप वळसे पाटील अजित पवार यांच्या घरी जाऊन समजूत काढत होते. शांत, मुरब्बी आणि धोरणी नेते असलेले वळसे-पाटील कालांतराने महाविकास आघाडीत मंत्री होणार ही जवळपास निश्चित गोष्ट होती. पण गेल्या दीड वर्षांत ते मंत्री होते हे अनेकांना माहीतही नव्हते. कामगार आणि उत्पादन शुल्क खाते त्यांच्याकडे होते, याची माहिती अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर झाली. वळसे पाटील यांना पहिल्याच टप्प्यात गृहमंत्रिपदाची ऑफर होती मात्र, त्यांनी प्रकृतीचे कारण सांगत ते नाकारले. पुढे दीड वर्ष त्यांना मिळालेल्या मंत्रालयांची ना नावे पुढे आली ना वळसे पाटील यांच्या नावाच्या बातम्या. त्यामुळे काहीसे झाकोळले गेलेले वळसे पाटील पुन्हा फ्रंटवर खेळण्यास पुढे आले आहेत.
शरद पवार यांचे होते पीए
वळसे-पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते असले तरी ते कधी काळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्वीय सहायक होते. ३० ऑक्टोंबर, १९५६ ला जन्मलेले पाटील हे काँग्रेसचे नेते दत्तात्रय वळसे पाटील यांचे पुत्र आहेत. दत्तात्रय वळसे पाटील हे पवारांचे घनिष्ट मित्र. त्यामुळे प्रारंभीचे राजकीय धडे त्यांनी पवारांकडे गिरविले. त्यानंतर १९९० मध्ये त्यांनी पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकीटावर आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून जिंकली. तेव्हापासून ते आंबेगाव मतदारसंघातून सलग निवडून येतात. १९९९ मध्ये ते शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात त्यांना प्रथम मंत्री म्हणून संधी मिळाली. पहिल्यांदाच ऊर्जा आणि वैद्यकीय शिक्षण खातं होतं. विविध खात्यांचे मंत्री म्हणून काम पाहिल्यानंतर २००९ ते २०१४ या काळात ते विधानसभेचे अध्यक्ष झाले.
विविध खाती सांभाळली
वळसे पाटील यांनी आतापर्यंत उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, ऊर्जामंत्री म्हणून काम पाहिले आहे. शांत स्वभाव आणि नम्र वागणे यामुळे ते मतदासंघात लोकप्रिय आहेत. १९९० पासून ते सलग आमदार म्हणून निवडून येतात. २००९ मध्ये ते विधानसभेचे अध्यक्ष राहिले.