अकोला- कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर अकोला व वाशीम जिल्ह्यात ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा तसेच कोरोना उपचारासाठी वापरण्यात येणारे रेमडीसीवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत रहावा यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग दक्ष असून सद्यस्थितीत पुरवठा पुरेसा आहे, असे सहायक आयुक्त (औषधे) व्ही. डी. सुलोचने यांनी कळविले आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अकोला व वाशिम जिल्ह्यासाठी ऑक्सीजन पुरवठा मे. सुरथी गॅसेस व मे.माउली उदयोग, अकोला यांचेकडुन निरंतर सुरु ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु असुन तो अखंडीतपणे सुरु राहण्यासाठी अन्न व औषध प्रशासन,मा.जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत. जिल्हयाची एकुण ऑक्सीजनची मागणी व त्या अनुषंगाने पुरवठयाचे नियोजन प्रशासनामार्फत केले जात आहे, पुरेसा ऑक्सीजन साठा, शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात उपलब्ध आहे. कोवीड या साथीच्या रोगासाठी प्रभावी ठरणारे रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा जिल्ह्यात नियमीत राहण्यासाठी प्रशासना मार्फत प्रयत्न सुरु आहेत. सध्या रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध असुन भविष्यातही ते उपलब्ध राहणार आहेत. अकोला जिल्ह्यातील खालील औषध दुकानांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध आहे.
१) मे आयकॉन मेडीकल, आयकॉन हॉस्पीटल, अकोला, २) मे.अॅपल मेडीकल, अकोला, ३) मे.वर्षा मेडीकल, अकोला, ४) मे.दत्त मेडीकल स्टोअर्स, अकोला, ५) मे.आरोग्य स्वस्त औषधी सेवा, अकोला, ६) मे.व्ही.एन.आर.एन. मेडीकल, आझोन मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल, अकोला, ७) बननेस फार्मा, अकोला तसेच वाशिम येथील १).मे.माउलीमेडीकल्स, वाशिम, २) मे.प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र, वाशिम,३) मे.श्रीनाथ मेडीकल, वाशिम, ४) मे.जिवनानी मेडीकल, वाशिम येथे रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा पुरेसा साठा शासकीय रुग्णालय, अकोला व वाशिम येथे उपलब्ध आहे.
सर्व रुग्णांना व वैदयकीय व्यावसायिकांना कळविण्यात येते की, पुरेसा साठा उपलब्ध असूनही उपलब्धतेबाबत काही अडचणी आल्यास अकोला जिल्ह्यासाठी औषध निरीक्षक सं.मो.राठोड व वाशिम जिल्ह्यासाठी हे.व.मेतकर यांना संपर्क करावा. प्रशासना मार्फत दैनंदिन उपलब्धतेचा आढावा घेण्यात येत असुन कुठेही तुटवडा होणार नाही, याचे नियोजन करण्यात येत आहे, असे सहायक आयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासने अकोला व्ही.डी. सुलोचने यांनी कळविले आहे.