लाखो चाहत्यांच्या मनावर गारूड घालणारे अभिनेते रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. तसं म्हटलं तर, मराठमोळ्या शिवाजीराव गायकवाड उर्फ रजनीकांत यांना त्यांच्या सिनेकारकीर्दीत हा पुरस्कार उशीराचं मिळाला, असं म्हणावं लागेल. अशा यादीत अनेक दिग्गजदेखील मागे नाहीत. आता मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. ते मुळचे मराठी आहेत. तसे तामिळनाडूला ते परप्रांतीयचं! पण, तिथल्या जनतेने त्यांना आपलंसं केलं. दक्षिणेत चित्रपटांचा मोठा पगडा आहे. तेथील लोक दिवसभर राबराब राबले तरी संध्याकाळी रजनीकांतच्या चित्रपटाचं तिकिट काढून पिक्चर बघणारचं! त्यांचा चित्रपट येणार म्हटल्यावर तेथील प्रेक्षक आठ-आठ दिवस आधी बुकिंग करतात. तेथील जनता त्यांना आपलंचं मानते.
एक बस कंडक्टर म्हणून काम करून थेट राजकारणापर्यंत मजल मारणाऱ्या रजनीकांत यांच्या नावावर अनेक पुरस्कार कोरले आहेत. त्यांच्या नावावर असणारी चित्रपटांची यादी तर संपतचं नाहीये. सालसपणा, कणखरपणा, रुबाबदार व्यक्तिमत्व जरी पडद्यावर दिसत असलं तरी पडद्यावरचा हा महानायक खऱ्याखुऱ्या जीवनात मात्र हसतमुख, पायात चप्पल वापरणारा, सामान्य माणूस म्हणून अत्यंत साधेपणाने चाहत्यांना सामोरं जातो.
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनी तामिळनाडूचे सर्वात प्रसिद्ध सेलिब्रिटी आहेत. चित्रपटांमधील डायलॉग बोलण्याचा त्यांचा एक वेगळाचं अंदाज आहे. देशातचं नव्हे तर परदेशातही त्यांचा आवाज आणि त्यांच्या स्टाईलचे दिवाने आहेत. अभिनयापेक्षादेखील त्यांची स्टाईल त्या काळातील दाक्षिणात्य अभिनेत्रींपेक्षा उठून दिसायची.
एक कंडक्टर म्हणून काम करताना त्यांचा अंदाज कुठल्याही स्टारपेक्षा कमी नव्हता. ते आपल्या वेगळ्या स्टाईलने तिकिट कापण्यासाठी आणि शिटी मारण्याच्या शैलीमुळे प्रवाशांमध्ये आणि दुसऱ्या बस कंडक्टर्समध्ये प्रसिध्द होते. अनेक व्यासपीठांवर नाटकं, चित्रपट आणि अभिनय करण्याची आवड नेहमीचं होती आणि हळूहळू हे स्वप्न सत्यात उतरलं.
रजनीकांत यांचा सिनेप्रवास कोणत्याही चित्रपटापेक्षा कमी नाही. त्यांना पडद्यावर आधी नकारात्मक भूमिका मिळाल्या. खलनायकाच्या भूमिकेपासून त्यांनी सुरुवात केली. मग, साईड रोल केले आणि अखेर एक हिरो म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख बनवली. शिवाजी चित्रपटासाठी जेव्हा त्यांना २६ कोटी रुपये देण्यात आले, तेव्हा ते जॅकी चेननंतर आशियातील सर्वात अधिक मानधन घेणारे अभिनेते ठरले होते. पुढील काळात रजनीकांत यांनी हे सिध्द केलं की, वय केवळ एक संख्या आहे आणि जर काहीतरी करून दाखवण्याचा दृढ निश्चय केला तर वय महत्त्वाचं ठरत नाही.
के. बालचंदर यांच्या ‘अपूर्व रागंगल’ (१९७५) या चित्रपटापासून रजनीकांत यांच्या रुपेरी पडद्य़ावरील कारकीर्द सुरू झाले. यामध्ये त्यांनी पत्नीला छळणाऱ्या पतीची भूमिका केली होती. या चित्रपटास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतरच्या ‘कथासंगम’ या न्यू वेव्ह स्टाईल चित्रपटात त्यांनी गावगुंडाची व्यक्तिरेखा समर्थपणे निभावली. ‘चिलकम्मा चेप्पींडी’ या तेलुगूपटात त्यांनी प्रथम नायकाची भूमिका केली होती. के. बालचंदर यांनी आपल्याला घडवले, असे ते म्हणतात. पण, असं असलं तरी एस. पी. मथुराम यांनी पहिल्यांदा त्यांना पॉझिटिव्ह भूमिका दिली होती. १९७८ मध्ये एका वर्षात त्यांनी २० तमिळ, तेलुगू आणि कन्नडपटात काम केले. ‘मुल्लम मलरूम’साठी त्यांना तामिळनाडू सरकारचा पुरस्कार मिऴाला होता. एनटीआर यांच्यासोबत त्यांनी ‘टायगर’मध्ये काम केले होते.
‘दोन महानायक’
‘मजबूर,’ ‘अमर अकबर ॲन्थोनी’ यांसारख्य़ा बॉलिवूडचे ‘महानायक’ अमिताभ बच्चन यांच्या ११ तामिळ चित्रपटांच्या रिमेक्समध्ये ‘महानायक’ रजनीकांत यांनी काम केले. पण, ‘डॉन’चा रिमेक असलेला चित्रपट ‘बिल्ला’मुळे त्यांना चांगले व्यावसायिक यश मिळाले. ‘बिल्ला’ केल्यानंतर रजनी यांना अधिक लोकप्रियता मिळाली. अमिताभसोबत त्यांना हिंदी चित्रपटांमध्ये काम केल. राजेश खन्ना यांच्यासोबत ‘बेवफाई’मध्ये खलनायकाची भूमिका पार पाडली. तर ‘ब्लडस्टोन’ (१९८८) या अमेरिकन चित्रपटात त्याने अस्खलित इंग्रजी बोलणाऱ्या भारतीय टॅक्सी ड्रायव्हरचे काम केले होते.
मणिरत्नम यांच्या ‘दलपती’मध्ये काम करून प्रचंड प्रसिध्दी मिळवली. ‘मुथू’ चित्रपटही गाजला.
मूळचं घराणं कोल्हापूरचं?
मध्यंतरी वाचनात आलं होतं की, भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी २०१६ मध्ये रजनी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्यांनी दावा केला होता की, गायकवाड घराणं हे कोल्हापूरचं आहे. तर खेड तालुक्यातील काहीजण म्हणतात की, गायकवाड फॅमिली ही त्यांच्या येथील आहे. तर पुरंदर तालुका आणि इतर महाराष्ट्रील काही ठिकाणं सुपरस्टार रजनीकांत आमच्य़ा येथील असल्याचा दावा करतात.
विनोदाच्या जगात रजनीकांत यांना एका अशा व्यक्तीच्या रूपात ओळखलं जातं. त्यांच्यावर जितके विनोद झाले, ते अगदी खेळाडूवृत्तीने त्यांनी ते स्वीकारलेले दिसते. वयाच्या ६५ व्या वर्षी रोबोट-२ करून त्यांनी आणलेला आपला नवा अंदाज लोकांच्या मनावर रुंजी घालून गेला. ‘पेट्टा,’ ‘काला,’ ‘कबाली,’ ‘दरबार’ असे चित्रपट करून त्यांनी आपलं अस्तित्व कायम ठेवलंय.