– डॉ. मिलिंद वाटवे
गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचे थैमान सुरू झाले. आधी जनता कर्फ्यू, मग लॉकडाऊन, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कोरोना वाढीचा उच्चांक आणि आता कोरोनाची दुसरी लाट या आजवरच्या प्रवासाचे आपण साक्षीदार आहोत. या वर्षी मार्च महिन्यात रुग्णवाढ आणि पर्यायाने संसर्गाचा वेग मारुतीच्या शेपटीप्रमाणे दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या साथ वेगाने पसरत असली तरी विषाणू सौम्य झालेला आहे, हे विसरून चालणार नाही.
सध्याचे कोरोना रुग्णवाढीचे आकडे पाहिले तर महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या पाहायला मिळते आहे. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम, पुदुचेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. सार्वजनिक सभा होत आहेत, नागरिकांची गर्दी होत आहे. असे असतानाही तिथे रुग्णसंख्या कमी आणि महाराष्ट्रात रुग्णसंख्येचा विस्फोट का, असा प्रश्न अगदी सामान्य माणसांनाही सतावत असणार. ‘महाराष्ट्रच का? आपले राज्य उपाययोजनांच्या बाबतीत कमी पडत आहे का?’ अशा अनेक चर्चा सध्या सुरू आहेत. मुळात साथरोग आपल्याला पुरेशा नेमकेपणाने कळलेलाच नाही. आपण समजतो आहोत त्याप्रमाणे लोक कसे वागतात, या एकाच गोष्टीवर साथीचा प्रसार अवलंबून नाही. विषाणूचे बदलते स्वरूप आणि साथीच्या संसर्गाचे स्वरूप ही खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. प्रतिबंधात्मक उपायांचा काहीसा परिणाम साथीच्या आजार रोखण्यासाठी अगदी मर्यादित प्रमाणात होऊ शकतो. मात्र, लोक गर्दी करत आहेत म्हणून कोरोनाचा प्रसार होत आहे, असे म्हणण्यात आणि नागरिकांना दोष देण्यात अर्थ नाही. कारण,
साथीच्या रोगाबद्दल बांधण्यात आलेले सगळे आडाखे आतापर्यंत अचूक ठरलेले नाहीत.
पाऊस आजवर कोणाला समजला आहे का? पावसाबाबत आजवर इतके संशोधन झाले आहे, अजूनही सुरू आहे. तरीही पाऊस पूर्णपणे समजलेला नाही. त्याप्रमाणेच साथीच्या रोगावर कितीही संशोधन झाले तरी त्यातील गुंतागुंत सहज समजण्यासारखी नाही. कोरोना विषाणूच्या साथीमधील गुंतागुंत अद्याप कोणालाच समजलेली नाही. आपण गुंतागुंतीची प्रक्रिया फार सोपी करून मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. याने त्याला ‘सुडो-सायन्स’ असे स्वरूप येत आहे.
संसर्गजन्य रोग पावसासारखाच जटिल आहे. पावसाचे साधे तत्त्व म्हणजे पाण्याचे बाष्पीभवन होते आणि वाफ वर जाते, पाण्याची वाफ घनस्वरूपात ढगात एकत्रित होते आणि अशा प्रकारे तयार झालेल्या पावसाचे थेंब खाली येतात. हे साधे तत्त्व सर्वांना माहीत आहे; परंतु, अशी साधी समज आपल्याला पावसाचा अंदाज लावण्यास मदत करत नाही. त्याचप्रमाणे कोरोना हा श्वसनसंस्थेद्वारे शरीरात शिरकाव करणारा विषाणू आहे, एवढेच आपल्याला समजले आहे. एवढी अपुरी समज लोकसंख्येच्या पातळीवर काय घडेल हे समजण्यास मदत करत नाही, साथीच्या आजारातील चढ-उतार, साथ कशामुळे अधिक पसरते आहे, याबद्दलचे भाकीत आतापर्यंत यशस्वी झालेले नाही. लोक पुरेशी काळजी घेत नाहीत म्हणून कोरोना महाराष्ट्रात पसरत आहे, यास कोणताही वैज्ञानिक पाया नाही. गेल्या एक वर्षातील सर्व देशांमधील डेटा दर्शवितो की लोकांच्या वागणुकीमुळे आणि प्रतिबंधात्मक उपायांमुळे रोगाचा प्रसार रोखण्यावर खूप मर्यादित प्रभाव पडतो.
आता दुसरी लाट फोफावत असताना नेमक्या कोणत्या गोष्टींवर भर द्यायला हवा, याचे आपण नियोजन केले पाहिजे. सध्या जे रुग्ण कोरोनाग्रस्त आढळून येत आहेत, त्यापैकी ९० टक्के जणांना काहीच त्रास होत नाही किंवा सौम्य लक्षणे आढळून येत आहेत. त्यामुळे किती लोकांना लागण होत आहे, यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी ज्यांची अवस्था गंभीर होत आहे, त्यांना कसे वाचवायचे यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. रुग्ण पॉझिटिव्ह आला म्हणून उपचार बदलत नाहीत. त्यांच्यामध्ये लक्षणे कोणत्या प्रकारची दिसताहेत, यावर उपचार ठरतात. म्हणजेच, उपचारपद्धती ही लक्षणांवर अवलंबून असते, पॉझिटिव्ह असण्यावर नाही. त्यामुळे किती जण पॉझिटिव्ह आले, यापेक्षा कोणाला कोणत्या स्वरूपाची लक्षणे आहेत आणि त्यावर उपचार कसे करता येतील, यावर भर देणे गरजेचे आहे.
जगात एका ठिकाणी जो उपाय लागू पडला तो दुसरीकडे लागू पडेलच असं नाही. उदाहरणादाखल, घरी बसून रोगाचा प्रसार कमी होईल की नाही हे वस्तीच्या प्रकारावर अवलंबून असेल. दाट वस्तीमध्ये लोकांना घरी बसवल्यामुळे संक्रमण कमी होईल की वाढेल हे सांगता येत नाही. अशा परिस्थितीत सामान्य माणसाने काय करावे? उत्तर सोपे आहे. प्रत्येक उपायामधला नफा – तोटा पाहावा. लॉकडाऊनची फार मोठी सामाजिक किंमत मोजावी लागते आणि त्याचा लाभ अद्याप सिद्ध झालेला नाही. त्यामुळे लॉकडाऊन अवैज्ञानिक आहे. दुसरीकडे, मास्क हा पर्याय कमी खर्चीक आहे त्यामुळे फायदे थोडे किंवा जास्त असले तरी असे उपाय जरूर वापरावेत.
दुसरीकडे, लाटेबद्दल जास्त चिंता करण्याची गरज नाही. कोविड उत्तरोत्तर सर्दी किंवा फ्लूच्या इतर विषाणूंसारखाच बनत आहे. गेल्या वर्षी हा खूपच घातक होता. आज इतर विषाणूंपेक्षा तो अजूनही थोडाच अधिक धोकादायक आहे; पण गेल्या वर्षीच्या तुलनेत अगदी कमी. नजीकच्या भविष्यात तरी कोरोना पूर्णपणे हद्दपार करता येणार नाही, हे शास्त्रज्ञांना वास्तववादी अभ्यासातून कळून चुकले आहे. त्यामुळे तो कमी प्राणघातक ठरावा, यासाठी लसीकरणासारखे शस्त्र आपल्या हाती आले आहे.
सर्दीचा विषाणूही वेगाने पसरतो. बहुतांश लोकांना वर्षातून एकदा तरी फ्लू होतो. त्याचा आपण बाऊ करतो का? कोरोनाचा विषाणूही दिवसेंदिवस सौम्य होतो आहे, त्याची घातकता कमी होत आहे. लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आहे. गेल्या वर्षभरात आरोग्य यंत्रणेच्या गाठीशी कोरोनाचा अनुभव आलेला आहे. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे लसीकरणाला सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये करोनाचा मृत्युदर खूप जास्ती होता. आता केसेस वाढल्या असल्या तरी मृत्युदरावर आपल्याला अधिक चांगले नियंत्रण मिळाले आहे. त्यामुळे साथ कोठे आणि कशी वाढते आहे, का वाढते आहे? ही गुंतागुंत बाजूला ठेवून रुग्णांची जास्तीतजास्त काळजी कशी घेता येईल, लसीकरणाचा वेग कसा वाढवता येईल यावर भर असायला हवा.