महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात मोलाचा वाटा असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या नावाने राज्य सरकारने एक योजना सूरू केली आहे. महाराष्ट्र सरकारने शरद पवार ग्रामसमृद्धी योजना सुरू केली आहे. याचा फायदा गावातील प्रत्येक शेतकऱ्याला आणि नवउद्योग करणाऱ्याला मिळणार आहे. या योजनेतून गाय, म्हैस, शेळी, कुक्कुट पालन शेड बांधकामासाठी अनुदान देण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार राज्यात ३ फेब्रुवारी २०२१ ही योजना राबवण्यास सुरूवात केली आहे. नेमकी काय आहे ही योजना? या योजनेचा लाभ कसा घ्यावा याची माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे.
४ कामांसाठी मिळणार अनुदान
गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधणे,
शेळीपालनासाठी शेड बांधणे,
कुक्कुटपालनासाठी शेड बांधणे,
भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग
या ४ कामांसाठी अनुदान मिळणार आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजना (रोहयो) अंतर्गत आणि काही योजनांच्या माध्यमातून शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबवण्यात येणार आहे. यामध्ये गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधकाम करण्यासाठी २ ते ६ गुरांसाठी एक गोठा बांधकामासाठी ७७१८८ रुपये इतके अनुदान दिले जाणार आहे. तर ६ पेक्षा अधिक म्हणजे दुप्पट १२ गुरांसाठी ही रक्कम त्यापटीत वाढून मिळणार आहे.
१० शेळ्या आणि त्यासाठी लागणाऱ्या बांधकामाला या योजनेत ४९२८४ रुपये अनुदान देण्यात येत. तसेच २० शेळ्यासाठी ही रक्कम दुप्पट स्वरुपात दिली जाणार आहे. याचबरोबर ज्यांच्याकडे १० शेळ्याच्या पालन पोशनाची सोय नसेल त्यांनी २ शेळ्यासाठी अर्ज केल्यास याचा लाभ घेता येतो. असे शासनाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
कुक्कुटपालन शेड बांधकाम १०० पक्ष्यांकरता शेड बांधण्यासाठी ४९७६० अनुदान दिले जाणार आहे. याचबरोबर १५० पेक्षा जास्त पक्षी असल्यास ही रक्कम दुप्पट होणार आहे. एखाद्याकडे १०० पक्षी नसल्यास तो १०० च्या स्टॅम्पवर दोन जामिनदारांची सही घेत शेडची मागणी करू शकतो पण शेडचे काम झाल्यावर त्यास १०० पक्षी आणणे बंधनकारक राहणार आहे.
भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग शेतातील कचरा एकत्र करून नाडेप पद्धतीने कंपोस्ट खत तयार करण्यासाठी १०५३७ रुपये अनुदान दिले जाणार आहे. या चारही कामांमधील बांधकामाच्या अधिक माहितीसाठी शासनाच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.
अर्ज कसा करायचा?
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे. सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्यापैकी कुणाकडे अर्ज करत आहात, त्यांच्या नावावर बरोबरची खूण करायची. त्याखाली ग्रामपंचायतीचे नाव, तालुका, जिल्हा टाकायचा आहे. त्यानंतर अर्जदाराचे नाव, पत्ता, तालुका, जिल्हा आणि मोबाईल क्रमांक भरायचा. ज्यासाठी अर्ज करणार आहे त्या कामासमोर बरोबरची खूण करायची आहे.
यानंतर आपली वयक्तीक माहिती यामध्ये भरायची आहे. याचबरोबर तुम्ही जो प्रकार निवडाल त्यासंबंधीचा कागदपत्राचा पुरावाही त्यासोबत जोडायचा आहे. लाभार्थ्यांच्या नावे जमीन आहे का, असल्यास हो म्हणून सातबारा, आठ-अ आणि ग्रामपंचायत नमुना ९ जोडायचा आहे. लाभार्थी सदर गावचा रहिवासी असल्यास रहिवासी दाखला जोडायचा आहे. तसेच तुम्ही निवडलेले काम तुम्ही रहिवासी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये येत आहे का, ते सांगायचे आहे.
यानंतर ग्रामसभेचा एक ठराव द्यायचा आहे. यासोबत सरपंच आणि ग्रामसेवकांच्या सहीचं एक शिफारस पत्र द्यावे लागणार आहे. यात लाभार्थी सदर कामाचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्याचे सांगितले जाईल. त्यानंतर तुमच्या कागदपत्रांची छाननी होईल आणि तुम्हाला पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या सही शिक्क्यानुसार पोचपावती दिली जाईल. यात तुम्ही लाभासाठी पात्र आहे की नाही ते नमूद केले जाईल. याचबरोबर तुम्ही मनरेगाचे लाभार्थी असाल तर तुम्हाला तसे नमुद करणे गरजेचे आहे.