अकोला- जिल्ह्यातील कोविड-19 चा प्रार्दुभाव लक्षात घेवून प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात रात्रीचे नऊवाजेपासून ते सकाळी सहावाजेपर्यंत रात्रीचे जमावबंदी व संचारबदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहे.
संचारबंदीच्या कालावधीत मुभा :
शासकीय तसेच खाजगी अॅम्बुलन्स सेवा, रात्रीच्या वेळेस सुरु राहणारी औषधीची दुकाने, कर्तव्यावरील पोलीस व आरोग्य तसेच आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधीत व्यक्ती किवा वाहने, कर्तव्यावरील रुग्णवाहतूक व हॉस्पीटल मधील डॉक्टर व पॅरामेडीकल स्टाफ, अत्यावश्यक सेवा, वीज, पाणी पुरवठा, दुरसंचार, औषधीची वाहने, अग्नीशमन, बँक व एटीएममध्ये पैसे भरणारी वाहणे व कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, जीवनावश्यक वस्तुची सेवा, वस्तू व माल यांची वाहतूक व कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, प्रसार माध्यम व त्यांचे प्रतिनिधी, वृत्तपत्र छपाई व वृत्तपत्र विक्रेते, रात्रीच्या वेळेस सुरु राहणारे पेट्रोल पंप व हायवेवरील पेट्रोल पंप व ढाबे, रेल्वेने तसेच एसटी बस व प्रायव्हेट लक्झरी ने उतरणाऱ्या प्रवाश्यांकरिता अँटोरिक्षा. तसेच जिल्हादंडाधिकारी यांनी परवानगी दिलेली वाहने व अधिकारी, कर्मचारी, व्यक्ती यांना संचारबंदीच्या कालावधीत मुबा राहिल.
सवलत दिलेल्या अधिकारी व कर्मचारी तसेच खाजगी व्यक्ती यांनी ओळखपत्र व विशेष कार्यासाठी नेमणूकांबाबतचे आदेश तसेच रुग्णांनी आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगणे बंधनकारक असेल. संबंधित व्यक्ती, संस्था व संघटना यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिकाऱ्यास प्राधिकृत करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कार्यवाही केल्या जाईल, असे आदेशात नमूद केले आहे.