पुणे : जिल्हाधिकारी, महापौर, महापालिकेचे अधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील लॉकडाऊनबाबत आज महत्त्वाचा निर्णय घेतला. ‘पुण्यात सध्या लॉकडाऊन करण्यात येणार नाही,’ असं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, नियमांची अंमलबजावणी कठोरपणे केली जाईल. नागरिकांनी नियम न पाळल्यास एप्रिलमध्ये लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल,’ असा इशाराही त्यांनी दिला.
पुणे शहरातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता, कोरोना प्रतिबंधासाठीचे निर्बंध फक्त कागदोपत्री ठेऊन चालणार नाही. या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा, अशी सूचना पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा प्रशासनाला केली आहे.
लॉकडाऊनचा निर्णय पुढच्या शुक्रवारी घेतला जाईल. खासगी रुग्णालयातील 50 टक्के बेड ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. लसीकरणाचे केंद्र वाढविण्यासाठी केंद्रीयमंत्री जावडेकर यांच्याशी संवाद साधला असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
लसीकरणाची केंद्रे 300 वरुन 600 होणार असून, त्याठिकाणी लस कमी पडण्याची शक्यता आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेक यांच्याशी संवाद साधला आहे. 1 तारखेपासून सर्वच कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही. नगरसेवक, आमदार, खासदार व इतर सर्व लोकप्रतिनिधींनी खासगी कार्यक्रम बंद केले पाहिजेत. लग्नात 50 तर अंत्यविधीसाठी 20 लोकांना परवनागी देण्यात आली आहे. पुण्यातील सध्या 25 टक्के पॅझिटिव्हिटी रेट आहे. रात्रीची संचारंबदी कायम असून, नियमांचे पालन करावे. नियम पाळले नाही तर 1 एप्रिलपासून निर्बंध कडक केले जाणार आहेत. 1 एप्रिल फूल समजू नका, असे त्यांनी नमूद केले.
सार्वजनिक वाहतूक सुरु असणार आहे. ऑक्सिजनचा तुटवडा होता. आता तसे नाही. खबरदारीचा उपाय म्हणून रायगड उत्पादकाला संपर्क करण्यात आला आहे. जम्बो सेंटर्स टप्प्याटप्प्याने सुरु होत आहेत. पिंपरीतील जम्बो सेंटर 1 एप्रिलपासून सुरु होणार आहे. ससूनमधील खांटाची संख्या वाढवून 500 केली जाणार आहे. ससूनमध्ये चाचण्यांची क्षमता वाढविण्यात आली आहे. रुग्णावाहिका कार्यन्वित राहतील, याची खबरदारी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.
कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही, असे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि लोकप्रतिनिधींनी व्यक्त केले आहे. पण अचानक लॉकडाऊन करुन चालणार नाही, लोकांना वेळ द्यावे लागेल, असे अजित पवारांनी स्पष्ट केले.
पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेऊन त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात जिल्हा आणि महापालिका प्रशासनाची आढावा बैठक बोलावली होती. आज सकाळी दहा वाजता ही बैठक सुरू झाली. या बैठकीला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पुणे व पिंपरी चिंचवड या दोन्ही पालिकांचे महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, दोन्ही पालिकांचे आयुक्त, दोन्ही शहरांचे पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक उपाययोजना आणि स्थानिक पातळीवर काही निर्बंध लावण्यात आले आहेत. तरीही कोरोनाचा विळखा वाढताना पाहायला मिळत आहे. त्यात पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूच्या प्रमाणातही मोठी वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. अशा स्थितीत पुणे शहर आणि जिल्ह्याची लॉकडाऊनच्या दिशेनं वाटचाल सुरु असल्याचंच पाहायला मिळत आहे.
पुणे, मुंबई आणि नागपूर या प्रमुख शहरांमध्ये वाढणारी कोरोना रुग्णसंख्या चिंता वाढविणारी आहे. नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास ज्या शहरात रुग्णसंख्या वाढत आहे, त्याठिकाणी पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल, असा सूचक इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याआधी दिला होता.