सेक्स हा आनंदी सहजीवनाच्या अनेक रहस्यांपैकी ते एक महत्त्वपूर्ण रहस्य आहे, असे अनेक संशोधकांचे मत आहे. आनंददायी सेक्स जीवन तुम्हाला दीर्घ काळापर्यंत एकमेकांशी बांधून ठेवते. पण, कोरोनातून बरे झाल्यानंतर लैंगिक समस्या येतात का? याच विषयी लैंगिक समस्या तज्ञ डॉ. राहुल पाटील यांना विचारले असता त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
कोरोनामुळे अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यातूनच स्त्री-पुरूषामध्ये लैंगिक इच्छा नसणे ही समस्या येते. पुरुषांमध्ये तर उत्तेजीतपणा कमी होणे ही समस्या येते. यावर उपचार म्हणून तेल, मलम तसेच पेपरमधील जाहिरातींवर विश्वास ठेवू नका. कोरोनातून बरे झाल्यावर कायमस्वरूपी अशी कोणतीही लैंगिक समस्या येत नाही, अशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली.
कोरोनाचा सेक्सवर परिणाम होतो का?
डॉ.राहुल पाटील म्हणतात, कोरोना बाधित व्यक्ती कोरोना मुक्त होते त्यानंतर त्या व्यक्तीमध्ये अशक्तपणा हा एक ते तीन महिने राहू शकतो. त्यामुळे सकस आहार घेणे, पाणी खूप पिणे आणि अशक्तपणा दूर होण्यासाठी डॉक्टरांनी जे औषधे सांगितले ते नियमित घेणे महत्त्वाचे असते. दरम्यान सेक्सची इच्छा कमी अधिक होऊ शकते.
जरी सेक्सची इच्छा झाली तरी सेक्स आसन मर्यादित करता येणे. तसेच अशक्तपणा असल्याने सेक्स करताना अशक्तपणा जास्तच वाढू शकतो. यावेळी पार्टनर्सनी आपापसात चर्चा करून लैंगिक सुख घेणे गरजेचे आहे. सेक्स अगदी परफेक्टच व्हावा असा हट्ट नको. एकमेकांच्या मिठीत राहणे, चुंबन घेणे यात देखील सुख घेता येईल. सध्या कोरोनामध्ये लैंगिक समस्या आल्या तरी थोडा काळ जाऊन द्यावा. बऱ्याच लोकांचे पुन्हा सुरळीत झाले आहे, अशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली.