जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्यामुळे सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. मात्र रुग्णांच्या तुलनेत सर्वोपचार रुग्णालयात खाटा आणि मनुष्यबळ कमी असल्याने रुग्णांना काही काळ जमिनीवर गादी टाकून उपचार घ्यावे लागत आहेत. डिस्चार्जनंतर बेड खाली झाल्यानंतर संबंधित रुग्णाला खाटेवर घेतले जात असल्याची वैद्यकीय सूत्रांची माहिती आहे. जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्यासारखी स्थिती आहे. कोविडसाठी ४५० खाटा राखीव असलेले सर्वोपचार रुग्णालय फुल झाल्यानंतर दाखल होणाऱ्या रुग्णांना काही काळ खाली गादी टाकून उपचार घ्यावे लागत आहे. वेळप्रसंगी गंभीर रुग्णावरही अशाच स्थितीत उपचार करावे लागत आहेत. तर दुसरीकडे तज्ज्ञ डाॅक्टरांची संख्या कमी असल्याने एका डाॅक्टरवर चार वाॅर्डांतील कामाचा ताण येत असल्याची सूत्रांची माहिती आहे. रुग्णसंख्या याच गदीने वाढल्यास रुग्णसेवा कोलमडून जाऊन परिस्थिती आणखी हाताबाहेर जाण्याचा धोका आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून कोविडसेवेत असलेल्या सर्वोपचार रुग्णालयावरच उपचाराची गरज निर्माण झाली आहे.
गरज १३ औषधवैद्यक तज्ज्ञांची; आहेत ३
सर्वोपचार रुग्णालयातील कोरोना वाॅर्डातील रुग्णसंख्या आणि नॉनकोविड रुग्णसेवा बघता किमान १३ औषधवैद्यक तज्ज्ञांची गरज आहे. मात्र सद्य:स्थितीत तीन औषधवैद्यक तज्ज्ञांवर रुग्णसेवेचा भार आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेमणुकीसाठी शासनाकडे मागणीही करण्यात आली आहे. रुग्णांची संख्या वाढली कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने अतिरिक्त खाटा कशा वाढवता येतील, त्या दृष्टीने तयारी सुरू आहे. अनेक रुग्णांना केअर सेंटरमध्ये पाठवत आहे. डॉ. मीनाक्षी गझभिये, अधिष्ठाता, सर्वोपचार रुग्णालय. तत्काळ दखल घ्या गैरसोयीविषयी रुग्ण व नातेवाईक कॉल करून मौखिक तक्रार करतात. खाली गादी टाकून रुग्णांवर उपचार करण्याची वेळ येऊ नये. या गंभीर बाबीची तत्काळ दखल घ्यावी. आशिष सावळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटना.
भयंकर : एकाच दिवसांत कोरोनामुळे सहा रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यातील कोरोनाची दहशत वाढत असून, मृत्यूंची संख्या वेगात वाढत आहे. बुधवारी, १७ मार्चला एकाच दिवसांत तब्बल सहा कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये ८० वर्षीय तीन रुग्ण, ९० वर्षीय एक आणि ६० व ६५ वर्ष अशा दोन रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान दिवसभरात कोरोनाचे ४७० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. ४८५ रुग्णांना सुटी दिली आहे. त्यामुळे आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या २२,७०८ झाली आहे. १७,२५५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ४१३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या ५,०४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
६ रुग्णांचा मृत्यू : पळसोबढे येथील ८० वर्षीय महिला रुग्ण, पातूर येथील ८० वर्षीय महिला रुग्ण; टिटवा ता. बार्शीटाकळी येथील ६० वर्षीय पुरुष ; पोळा चौक, अकोला येथील ९० वर्षीय पुरुष ;उमरा, अकोट येथील ६५ वर्षीय पुरुष ; सावरा, अकोट येथील ८० वर्षीय पुरुष. रॅपिडमधून ६० पॉझिटिव्ह : गेल्या २४ तासात रॅपिडच्या ३११ चाचण्यांत ६० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यात अकोटचे पाच, पातूरचे दोन, तेल्हाऱ्याचे तीन, मूर्तिजापूरचे १० अहवाल पॉझिटिव्ह आले.आयएमए येथे १०, वैद्यकीय महाविद्यालयातून ३० अहवाल पॉझिटिव्ह आले.
गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढले
अकोला जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह लगतच्या जिल्ह्यातील गंभीर रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल होत आहेत. बुधवारी १७ मार्चला दुपारी दोनच्या सुमारास दाखल रुग्णांची संख्या सुमारे ४१० होती. सर्वोपचार रुग्णालयात जमिनीवर गादी टाकून रुग्णावर उपचार करण्यात येत आहेत.
स्मशानभूमीत मिळेल त्या जागी अंत्यसंस्कार
मृतकांची संख्या अचानक वाढल्याने स्मशानभूमीतील अंत्यसंस्कारासाठीच्या प्रस्तावित जागाही फुल झाल्या आहेत. त्याठिकाणच्या अस्थी व रक्षा संकलनाला वेळ द्यावा लागतो. सध्या कोरोनाबळींची संख्या वाढत असल्याने प्रस्तावित जागांव्यतिरीक्त स्मशानभूमी परिसरात मिळेल त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याची वेळ मृत रुग्णांच्या नातेवाइकांवर आली आहे.