अकोला – पुन्हा आठवडी बाजार सुरु करण्याची बाब प्रशासनाच्या विचाराधीन आहे. त्यासाठी आठवडी बाजारातील व्यावसायिकांचे नजिकच्या केंद्रात स्वॅब घेऊन कोविड चाचण्या करुन घ्याव्या,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकीत त्यांनी वरील निर्देश दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटियार, मनपा आयुक्त निमा अरोरा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की, आठवडी बाजार सुरु करण्याच्या निर्णयाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून आठवडी बाजारात जे व्यावसायिक व्यवसाय करण्यासाठी येतात त्यांच्या आरटीपीसीआर वा रॅपिड ॲन्टिजेन चाचण्या करणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी हे आठवडी बाजार सुरु करावयाचे असतील तेथील व्यावसायिकांनी आपल्या नजिकच्या केंद्रात जाऊन आपली चाचणी करुन घ्यावी. येत्या 25 तारखेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी,असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
या बैठकीत कोविड चाचण्यांचा तसेच लसीकरणाचा वेग वाढविणे, शहरी भागातील कन्टेन्मेंट झोन, सुपर स्प्रेडरच्या चाचण्या बाबत चर्चा करुन त्याबाबत गतिमान कारवाई करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी पापळकर यांनी यंत्रणेला दिल्या.