अकोला – जागतिक ग्राहक दिनानिमित्त पुरवठा विभागाच्यावतीने आज अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनात ‘जागतिक ग्राहक दिन’ ऑनलाईन वेबीनारव्दारे साजरा करण्यात आला. ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी ग्राहक न्यायमंचाची स्थापना करण्यात आली असून त्याद्वारे ग्राहकांना न्याय मिळवून दिला जातो. तथापि ग्राहकांनीही आपल्या हक्कांबाबत जागरुक रहावे व अन्यायकारक व्यापार पद्धतीस बळी पडू नये,असे आवाहन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्ष श्रीमती एस.एम. उंटवाले यांनी केले.
यावेळी या ग्राहक दिनानिमित्त ‘Tackle Plastic Pollution’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. ही संकल्पना सर्वांनी एकत्र येवून यशस्वी करावी,असे आवाहन अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी केले.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी बाबासाहेब गाढवे, जिल्हा सूचना अधिकारी अनिल चिंचोले, ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्ष श्रीमती एस.एम. उंटवाले, राष्ट्रीय ग्राहक संरक्षण संघाचे अध्यक्ष संजय पाठक तसेच जिल्ह्यातील गॅस एजेन्सी, सहाय्यक आयुक्त अन्न व प्रशासन, वजन मापे निरीक्षक, वीज वितरण कंपनी व तसेच सर्व निरिक्षण अधिकारी आदी उपस्थित होते.
कोरोणा विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर जागतिक ग्राहक दिन ऑनलाईन वेबीनारव्दारे घेण्यात आला. यावेळी श्रीमती एस. एम. उंटवाले यांनी ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या सुधारीत कायद्यातील तरतुदीच्या अनुषंगाने ग्राहकांच्या हक्कांना प्रोत्साहन, संरक्षण देवुन ग्राहक संरक्षणाचे अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन, तपासणी, तक्रारी, खटला चालविणे, असुरक्षित वस्तु व सेवा परत मागविणे, अन्यायकारक व्यापार पद्धती बंद करणे व दिशाभुल करणाऱ्या जाहीरातीवर दंड आकारणे आदींच्या अधिकाराबाबत मार्गदर्शन केले. तसेच ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत येणाऱ्या खटल्याबाबत जिल्हा, राज्य व केंद्र यांच्याकडे असणाऱ्या खटले चालवण्या संदर्भातील वित्तीय अधिकाराची जाणीव करुन दिली. ग्राहकांना त्यांना न्याय मिळविण्यासाठी खटले सर्वोच्च न्यायालयात सुद्धा चालवु शकतात याची माहिती दिली.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणे व तक्रार सादर करण्याबाबत ऑनलाईन माहिती दिली. तर अकोला गॅस एजन्सी अकोला यांनी त्यांचे एजन्सी मार्फत ऑनलाईन डेमो देवुन व आवश्यक साहीत्य फोटो इत्यादींची प्रदर्शनी लावुन जागतिक ग्राहक दिनाचे महत्व ग्राहकांना समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन शितल मोरखडे यांनी केले तर प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी केले. आभार प्रदर्शन अन्न धान्य वितरण अधिकारी बी. डी. अरखराव यांनी केले आहे.