हिवरखेड (धीरज बजाज)- अकोला- खंडवा- इंदोर या रेल्वे मार्गावरील अकोट- हिवरखेड- आमला खुर्द ह्या टप्प्याचे काम अनेक वर्षांपासून अजून सुद्धा सुरू होऊ शकले नाही. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अकोट हिवरखेड खंडवा या रेल्वे मार्गाचे काम कधी सुरू होणार? असा संतप्त सवाल जनता विचारत आहे. या परिसरातील लाखो रेल्वे रेल्वे प्रवासी रेल मार्गापासून वंचितच राहतील काय हा प्रश्न सुद्धा निर्माण झाला आहे. दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद चे महाप्रबंधक श्री गजानन माल्ल्या यांचा 10 मार्च रोजी सकाळी अकोला नियोजित दौरा असल्याने ते नऊ तारखेलाच अकोला पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
त्यांच्या महत्वपूर्ण दौऱ्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. रेल्वे प्रवाशांना अपेक्षा आहे की या क्षेत्राशी निगडित अनेक समस्यांवर महाप्रबंधकांनी सकारात्मक निर्णय घ्यावा. ज्यामध्ये प्रामुख्याने खालील मागण्या महत्त्वपूर्ण आहेत.
अकोट- आम्लाखुर्द सेक्शनचे ब्रॉडगेज परिवर्तनाचे कार्य लवकरात लवकर सुरू व्हावे कारण 1 जानेवारी 2017 पासून हा मार्ग बंद करण्यात आला होता. चार वर्ष उलटूनही फक्त अकोला अकोट ह्या 44 किलोमीटर मार्गाचेच काम पूर्ण होऊ शकले आहे. आता अकोला अकोट सेक्शन चे लोकार्पण केले जावे आणि खालील गाड्यांचे संचालन लवकरात लवकर सुरू व्हावे. अकोट औरंगाबाद आकोट नवीन डेली इंटरसिटी एक्सप्रेस व्हाया अकोला वाशिम हिंगोली पूर्णा परभणी जालना सुरू व्हावी. नांदेड अकोट नांदेड नवीन फास्ट पॅसेंजर व्हाया पूर्णा अकोला सुरू करावी. गाडी क्रमांक 57547 हैदराबाद पूर्णा पॅसेंजर ला इंटरसिटी एक्सप्रेस मध्ये बदलून हिंगोली वाशिम अकोला मार्गे आकोट पर्यंत चालवावी.
पूर्णा हुन अकोला पर्यंत येणाऱ्या सर्व गाड्यांना आकोट पर्यंत चालवावे. ज्यामुळे अकोला, मेळघाट, अमरावती, बुलढाणा, जिल्हे आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागातील सर्व वंचित लोकांना नवीन लांब पल्ल्यांच्या गाड्यांची सुविधा उपलब्ध होईल. अशा प्रकारच्या मागण्या हिवरखेड विकास मंच, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, तेल्हारा तालुका मंडप बिछायत डेकोरेशन असोसिएशन, समस्त व्यापारी संघटना हिवरखेड, सामाजिक कार्यकर्ते धिरज संतोष बजाज, सुरेश ज्ञानदेवराव गिऱ्हे, प्रकाश नकथमल शर्मा, शोएब वासेसा हिंगोली, सै रियाज अली हिंगोली इत्यादी रेल्वे प्रेमी नागरिक आणि विविध संघटनांनी केली आहे.
प्रतिक्रिया
दक्षिण मध्य रेल्वे महाप्रबंधकांना विनंती आहे की अकोट पर्यंत काही पॅसेंजर आणि एक्सप्रेस गाड्या तत्काळ सुरू कराव्यात. अकोट हिवरखेड आमलाखुर्द सेक्शनच्या ब्रॉडगेज चे काम त्वरित सुरू करून रेल्वे प्रवाशांना न्याय द्यावा.
धिरज बजाज, सामाजिक कार्यकर्ते हिवरखेड जि. अकोला