अकोला : कोरोना विषाणू संसर्ग वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांनी महापालिका क्षेत्र प्रतिबंधित म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात ८ मार्चपर्यंत कडक निर्बंध लावत केवळ अत्यावश्यक सेवेची दुकाने दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु त्यानंतर सुद्धा मंगळवारी (ता. २) शहरातील इंदोर गल्लीतील ९ कपडा व्यावसायिकांसह जठारपेठ येथील एक सलूनचे दुकान उघडण्यात आले होते. त्यामुळे संबंधितांवर महापालिकेने कारवाईचा दंडूका चालवत प्रत्येकाला पाच हजार रुपये या प्रमाणे ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. महापालिकेच्या या करावाईमुळे व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.
फेब्रुवारी महिन्यापासून महापालिका क्षेत्रामध्ये कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना संपूर्ण महानगरपालिका क्षेत्र प्रतिबंधित म्हणून जाहीर केले आहे व मनपा क्षेत्रामध्ये टाळेबंदी लावली आहे. परंतु जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत टाळेबंदीतून सुट देण्यात आली आहे. असे असल्यानंतर सुद्धा मंगळवारी (ता. २) दुपारी महापालिका क्षेत्रातील काळा चबुतरा येथील इंदौर गल्लीमध्ये काही व्यापारी आस्थापनातील दुकानदारांनी आपली दुकाने उघडली होती. यासंबंधी महापालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व दुकान मालकांवर मनपा बाजार विभाग आणि अतिक्रमण विभागाने प्रत्येकी ५ हजार रुपये दंड ठोठावला. त्यासोबतच जठारपेठ येथील मोनोलिसा सलून सुद्धा सुरू असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली. एकूण दहा दुकाने सुरू असल्याने प्रत्येकी पाच-पाच हजार रुपये या प्रमाणे ५० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
यांच्यावर केली कारवाई
काला चबुतरा येथील इंदोर गल्लीमधील जोया कलेक्शन, पूनम साडी सेंटर, मोहन मॅचिंग सेंटर, शाकंभरी साडीज, सहानी साडीज, न्यू कृष्ण क्लॉथ सेंटर, ए.के. फुटवेअर, शगुन साडीज, बाबा ड्रेसेस यांच्यासह जठारपेठ येथील मोनोलिसा सलून कारवाई करण्यात आली.