अकोला : कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता महानगरपालिका क्षेत्रात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ता. ८ मार्चपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. या काळात जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळता इतर दुकाने उघडण्यास मनाई आहे. तरीही काही दुकाने सुरू असल्याचे लक्षात आल्याने आता महानगरपालिका प्रशासनाने अशा दुकानदारांविरुद्ध कठोर भूमिका घेत थेट पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना विषाणूचा (कोव्हीड-१९) प्रभाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ ता.१३ मार्च २०२० पासून लागू आहे. खंड २, ३ व ४ मधील तरतुदीची अंमलबजावणीसाठी ता.१४ मार्च २०२० रोजी अधिसूचना निर्गमित केलेली आहे. या अधिसुचनेनुसार अकोला महानगरपालिका क्षेत्रात कोविड-२१ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.
त्याकरण्यासाठी महानगरपालिका आयुक्त यांना सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. अकोला शहरामध्ये कोविड १९-चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिवसेंदिवस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अकोला जिल्ह्यामध्ये ता.१ ते ८ मार्च २०२१ पर्यंत जीवनावश्यक दुकाने, किराणा, औषध दुकाने, स्वस्त धान्य दुकाने सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा आदेश दिला आहे.
परंतू शहरामध्ये निर्बंध घालण्यात आलेली काही बिगर जीवनाश्यक दुकाने, आस्थापना सुरू असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्याअनुषंगाने क्षेत्रिय अधिकारी, अतिक्रमण विभाग प्रमुख, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक व दंडात्मक कार्यवाही पथकातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना आदेशित करण्यात आले आहे की, ता. १ मार्च ते ८ मार्च २०२१ या कालावधीत सुरू असलेली बिगर जीवनावश्यक दुकाने, आस्थापना यांचेवर पाच हजार रुपये दंडात्मक कारवाई करावी किंवा दंडाची रक्कम न भरल्यास त्यांचेवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, असा आदेश मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांनी दिला आहे.
एकीकडे व्यापाऱ्यांची विनंती, दुसरीकडे सक्तीचे आदेश
शहरातील विविध व्यापारी संघटनांनी जीवनावश्यक वस्तूंसोबतच इतर दुकानेही कोरोना नियमांचे पालन करून सकाळी ८ ते दुपारी ३ या वेळेत सुरू ठेवण्याची विनंती प्रशासनाला केली. व्यावसायिकांच्या या विनंतीला मान देण्या ऐवजी महानगरपालिका प्रशासाने बिगर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी दिल्यास सक्तीने कारवाईचा आदेश दिला आहे.