हैदराबाद : भाजी मंडईतील टाकलेल्या भाज्या व अन्य कचरा बर्याच समस्या निर्माण करीत असतो. मात्र, हैदराबादमधील बोेवेनपल्ली येथील भाजी मंडई याच कचर्याचा वीजनिर्मितीसाठी वापर करीत आहे. तेथील भाज्या, फळे व फुलांचा कचरा फेकला जात नाही तर त्याचा वापर वीज आणि बायोगॅस बनवण्यासाठी होतो.
बोवेनपल्ली मंडईत रोज सुमारे दहा टन कचरा गोळा होतो. असा कचरा काही काळापूर्वी लँडफिलमध्ये टाकला जात असे. आता तेथील जैविक कचर्यापासून रोज सुमारे 500 युनिट वीज निर्माण होत आहे. तसेच 30 किलो बायोगॅसही बनवला जात आहे. तेथील कचर्यापासून बनलेल्या विजेचा वापर रस्त्यावरील शंभर दिवे, 170 स्टॉल्स, एक प्रशासकीय भवन आणि पाणीपुरवठा यंत्रणेसाठी केला जातो. उत्पादित बायोगॅस मंडईतील कँटिनमध्ये स्वयंपाकासाठी पुरवला जातो. मंडईतील जैविक कचरा आधी कन्वेजर बेल्टवर ठेवला जातो. तो कचरा बारीक करतो आणि नंतर त्याचे रूपांतर एका लगद्यात होते. हा लगदा अपघटनासाठी मोठे कंटेनर किंवा खड्ड्यांमध्ये टाकला जातो. त्याचे रूपांतर जैविक इंधनात होते. त्याचा शंभर टक्के बायोगॅसने चालणार्या जनरेटरमध्ये वापर केला जातो. त्यापासून विजेची निर्मिती केली जाते. हैदराबादमधील सीएसआयआर-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) ने हा उपक्रम केला आहे.