अकोला : हास्यातून दैनंदिन जीवनातील ताणतणाव क्षणात दूर करणारे अरविंद भाेंडे हे मोठं आणि सदाबहार नाव. यासाठी त्यांना साहित्य क्षेत्रातील मानाचा गदिमा पुरस्कारही प्राप्त झाला हाेता. ‘आपल्या कार्यक्रम असा की पाेटभर हसा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिकांना पोटभर हसविले.
मात्र,२८ फेब्रुवारी राेजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास वयाच्या 57 व्या वर्षी अरविंद भाेंडे यांचे निधन झालं. अकाेल्याच्या साहित्य क्षेत्राला समृद्ध करणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे साहित्य क्षेत्राची फारमाेठी हानी झाल्याची प्रतिक्रिया साहित्य वर्तुळात व्यक्त हाेत आहे. त्यांच्या जाण्याची बातमी कळताचं कुणाचाही विश्वास बसत नव्हता. अतिशय त्यांच्याबद्दल बोलतांना साहित्यिकांना शब्दही सुचत नव्हते.
मृत्यूला कवटाळण्याचं
हे काही वय नाही
तुझ्याविणा जगण्याची
मित्रा आम्हाला सवय नाही
जिवाभावाचा सोबती
नियतीने उडवून नेला
आयुष्यभर हसवणारा
जाता जाता रडवून गेला
मैफिलीत रंग भरता भरता
तु अचानक ऊठून गेला
तुझ्यावर घाला घालतांना
कंठ काळाचाही दाटून आला
डोळ्याची कड ओली
काळजाची जखम ओली
तुझ्या आत्म्याला शांती लाभो
दोस्ता ! भावपूर्ण आदरांजली
अशा शब्दांत मायबोली साहित्य प्रतिष्ठानचे संसथापक अध्यक्ष ॲड्. अनंत खेळकर यांनी आदरांजली वाहिली.
अरविंद भोंडे यांची ‘काेण म्हणते भारत देश महान नाही’ ही कविता खुपच गाजली हाेती. पाटबंधारे विभागात नाेकरी सांभाळून त्यांना संपूर्ण महाराष्ट्राभर रसिकांना पोटभर हसविले. मात्र, सर्वांना हसविणारा कलावंत जग साेडून गेला आहे.
अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष पदाची धुरा सांभाळत, त्यांनी पुन्हा अंकुर साहित्य संघाला नवसंजीवनी प्राप्त करून दिली हाेती. दरम्यान, अरविंद भाेंडे यांनी चार राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलने यशस्वी केली. गत १४ दिवसांपासून ते कोरोनामुळे शहरातील खासगी दवाखान्यात उपचार घेत होते. त्यांच्यापश्चात त्यांच्या पत्नी, एक विवाहित मुलगी, मुलगा-सून आणि मोठा आप्तपरिवार आहे.